Ram Shinde Sabhapati : सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली जांबवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची भेट, शेळके व पवार कुटूंबियांचे सांत्वन करत दिला धीर !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ram Shinde Sabhapati : बोलेरो गाडी विहिरीत कोसळून चार तरूणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली होती. या घटनेतील शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवारी जांबवाडी येथील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले. या दु:खद प्रसंगी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सरकारकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असा धीर देत प्रा राम शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना दिलासा दिला.

जामखेड तालुक्यातील जांबवाडी शिवारात बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली होती. या घटनेत भरधाव बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहीरीत कोसळली. या गाडीतून प्रवास करणारे अशोक विठ्ठल शेळके वय २९, रामहरी गंगाधर शेळके वय ३५, किशोर मोहन पवार वय ३० सर्व राहणार जांबवाडी व चक्रपाणी सुनिल बारस्कर वय २५, रा. राळेभात वस्ती जामखेड या चौघा तरूणांचा मृत्यू झाला होता.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे (Ram Shinde Sabhapati) यांनी शुक्रवारी जामखेड तालुक्यातील जांबवाडी गावाला भेट दिली. यावेळी प्रा.राम शिंदे यांनी जांबवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला. घडलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शेळके, पवार व बारस्कर या कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या दु:खद प्रसंगी मी व महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी आहे. सरकारकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असा धीर यावेळी शिंदे यांनी दिला.

जांबवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांशी संवाद साधताना प्रा राम शिंदे हे भावनिक झाले होते. जांबवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांच्या मदतीसाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत अश्या सुचना यावेळी प्रा शिंदे यांनी प्रांताधिकारी नितीन पाटील यांना यावेळी दिल्या. यावेळी माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, माजी उपसभापती रविंद्र सुरवसे, सभापती शरद कार्ले, पांडुरंग उबाळे, ॲड प्रविण सानप, अमित चिंतामणी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने, तात्याराम पोकळे, सोमनाथ राळेभात, लहू शिंदे, आबासाहेब ढवळे, मोहन देवकाते, संजय गोपाळघरे, कांतीलाल वराट सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
साकत येथील पाटील व लहाने कुटूंबियांचे प्रा राम शिंदे यांनी केले सांत्वन
दरम्यान, जांबवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबातील सदस्यांची भेट घेण्याआधी प्रा. राम शिंदे यांनी साकत येथे भेट दिली. माजी सरपंच तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जामखेड तालुका उपाध्यक्ष स्वर्गीय हनुमंत साहेबराव मुरूमकर पाटील यांच्या कुटूंबाची भेट घेत सांत्वन केले. माजी सरपंच हनुमंत पाटील यांचे दोन दिवसांपुर्वी दु:खद निधन झाले होते. यावेळी प्रा शिंदे यांनी पाटील कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होत त्यांचे सांत्वन केले.

त्यानंतर ल. ना होशिंग विद्यालयातील शिक्षक भरत लहाने यांचे पुतणे रूपेश महादेव लहाने (वय 32) यांचे नुकतेच निधन झाले होते. यावेळी प्रा राम शिंदे यांनी लहाने कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

जवळके येथील घोलप कुटूंबियांचे प्रा राम शिंदे यांनी केले सांत्वन
जवळके येथेही प्रा राम शिंदे यांनी आज भेट दिली. जवळके येथील सौरभ तुळशीराम घोलप (वय १३) या चिमुकल्याचा काही दिवसांपुर्वी अपघाती मृत्यु झाला होता.यावेळी प्रा राम शिंदे यांनी घोलप कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी सरपंच सुभाष माने, बब्रुवान वाळुंजकर, मच्छिंद्र वाळुंजकर, भिमराव माने, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष वाळुंजकर, पृथ्वीराज वाळुंजकर सह आदी उपस्थित होते.

पवार कुटूंबियांचे प्रा राम शिंदे यांनी केले सांत्वन
संभाजी ब्रिगेडचे धडाडीचे कार्यकर्ते अवधूत पवार यांचे वडील प्रा आ.य. पवार यांचे नुकतेच निधन झाले होते. दिवंगत प्रा आ.य.पवार हे जेष्ठ साहित्यिक, कवी, लेखक म्हणून राज्यात प्रसिद्ध होते. सभापती प्रा राम शिंदे यांनी आज जामखेड शहरात पवार कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

तसेच जामखेड तालुक्यातील हळगाव येथील किराणा दुकानदार रावसाहेब ढवळे (आर.के. टेलर) यांचे चिरंजीव तुषार ढवळे याचे नुकतेच निधन झाले होते. प्रा राम शिंदे यांनी ढवळे कुटूंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.