- Advertisement -

जामखेड तालुक्यात पाऊस  : अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील तीन तासांत जोरदार पाऊस, अलर्ट जारी 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । गेल्या काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदल होत आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र विकसीत झाल्याने महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. अगामी दोन दिवस राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

येत्या तीन तासात विजांसह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस: पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी, रायगड, ठाणे या भागात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. (Rain in Jamkhed taluka: Heavy rain in the next three hours in several districts of the state including Ahmednagar, alert issued)

जामखेड तालुक्यात मागील दोन तीन दिवसांपासून पावसाचं वातावरण रोज तयार होत आहे. रविवारी सायंकाळी 5 नंतर  जामखेड तालुक्यातील अनेक भागात जोरदार सरी कोसळल्या. काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. अकाशात ढगांची गर्दी अजुनही कायम असल्याने रात्री तालुक्यात पाऊस होऊ शकतो अशी स्थिती आहे.

अवकाळी पावसाच्या हजेरीने रब्बी हंगामातील पिकांना फायदा होऊ शकतो. सध्या तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे. विजेच्या लपंडावाने बळीराजा हैराण आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात अगामी तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून रविवारी नवा हवामान अंदाज जारी करण्यात आला आहे. या अंदाजानुसार पुर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. अगामी दोन दिवसांसाठी अहमदनगर, नाशिक, बीड, नांदेड , लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.