पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीमुळे कर्जत-जामखेडमध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जामखेड टाइम्स वृत्तसेवा , दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीमुळे कर्जत-जामखेड परिसरात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी ९१ कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सुतगिरणीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निमगांव डाकू येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू दरम्यानचा २.७०० किलोमीटर लांबीचा रस्ता साकारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने ३ कोटी ९४ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणी याच रस्त्यावर असल्याने ५.५० मीटर रुंद डांबरी रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. पाच वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती खर्चासाठी आवश्यक निधीची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे.