जामखेड : कांद्याच्या आड अफूचा मळा; बांधखडक शिवारात ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, खर्डा पोलिसांची धडाकेबाज कारवाई !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पोलिसांनी कर्जतच्या चापडगाव येथील अफूच्या शेतीचा घटना ताजी असतानाच, आता जामखेड तालुक्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. बांधखडक शिवारात कांद्याच्या पिकात लपवून केलेली अफूची शेती खर्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत सुमारे ६ लाख १७ हजार ७२५ रुपये किमतीची २२ किलो ५६१ ग्रॅम अफूची झाडे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Opium plantation found next to onions, Goods worth 6 lakhs seized in Bandhkhadak Shivara, two arrested, Kharda police take drastic action, jamkhed kharda news,

​नेमकी घटना काय?

जामखेड तालुक्यातील बांधखडक शिवारात सुधाकर एकनाथ वारे आणि मारुती विश्वनाथ वारे यांनी त्यांच्या शेत गट क्रमांक १९१ व १९२ मध्ये प्रतिबंधीत अफूची लागवड केली आहे. अशी माहिती खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि उज्वलसिंह राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती होती. बातमीची खातरजमा झाल्यानंतर खर्डा पोलिसांनी बांधखडक शिवारात छापेमारी केली.

​पोलिसांची धाड आणि कारवाई

मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वारे यांच्या शेतात धाड टाकली. यावेळी शेतात कांद्याच्या पिकाच्या आडोशाने अफूची जोपासना केली जात असल्याचे निदर्शनास आले. आरोपींनी गेल्या ३-४ महिन्यांपासून या झाडांना खते आणि पाणी देऊन त्यांचे संवर्धन केल्याची कबुली दिली.

​जप्त केलेला मुद्देमाल आणि गुन्हा

पोलिसांनी घटनास्थळावरून ६,१७,७२५ रुपये किमतीची एकूण २२ किलो ५६१ ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप गुलाब धामणे यांच्या फिर्यादीवरून सुधाकर वारे आणि मारुती वारे यांच्या विरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा १९८५ (NDPS Act) च्या कलम ८ (क) आणि १८ (क) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर ३६/२०२६ अन्वये दाखल करण्यात आला आहे.

​यांनी केली कारवाई

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे, डीवायएसपी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उज्वलसिंह राजपूत, अंमलदार संभाजी शेंडे, संदीप धामणे, गोकुळ इंगवले, प्रवीण थोरात, विष्णू आवारे, धनराज बिराजदार, शाम चखाले, बाळू खाडे, अशोक बडे, शशी म्हस्के, मुन्ना शेख आणि पथकाने केली. या कारवाईत कर्जत विभागाच्या फॉरेन्सिक टीमचीही मदत घेण्यात आली. सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि उज्वलसिंह राजपूत करत आहेत.