रविवारी अहमदनगर येथे महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2021, असे आहे परीक्षेचे नियोजन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । MPSC Group C Prelims Exam 2021। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२१ रविवार ३ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील ४१ उपकेंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येणार आहे.

या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे. यासाठी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. असे अहमदनगरचे उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जून यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

या परिक्षेसाठी अहमदनगर शहरातील ४१ उपकेंद्रावर (शाळा/महाविदयालय) उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

तसेच परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने बंद ठेवणेकामी परिक्षेच्या दिवशी परिक्षाक्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता कलम १९७३ चे कलम १४४ (३) लागू करण्यात आलेले आहे.

यावेळेत परीक्षार्थी व परिक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस या परिसरात प्रवेश करता येणार नाही. असेही श्रीनिवास अर्जून यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.