खासदार संभाजीराजे आमदार तानाजी सावंतांच्या भेटीला, पुण्यात बैठक सुरु, शिवसेनेला भगदाड पडणार ? राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : शिवसेनेचे परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत (ShivSena MLA Tanaji Sawant) हे शिवसेनेत अस्वस्थ आहेत. ते शिवसेनेवर नाराज असुन पक्ष बदलणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. अश्यातच सावंत यांच्या संबंधी एक महत्वाची घडामोड रविवारी समोर आली आहे.

आमदार तानाजी सावंत यांच्या भेटीसाठी भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे पुण्यात दाखल झाले आहेत. ही बैठक सावंत यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी सुरू आहे. गेल्या काही वेळापासून सावंत व संभाजीराजे यांच्यात चर्चा सुरू आहे. या भेटीकडे राजकीय अंगाने पाहिले जात आहे. सावंत हे शिवसेनेत नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सावंत यांची घेतलेली भेट चर्चेची ठरली आहे. (MP SambhajiRaje meets MLA Tanaji Sawant, meeting begins in Pune)

संभाजीराजे यांच्या माध्यमांतून आमदार तानाजी सावंत भाजपच्या तंबूत दाखल होण्यासाठी प्रयत्नशील आहेत का ? की आजची भेट ही कौटुंबिक आहे. याबाबत दोन्ही नेत्यांच्या खुलाश्यानंतरच सर्वकाही स्पष्ट होईल. दरम्यान  तानाजी सावंत हे आज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करताना भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे

तानाजी सावंत यांनी आपली पुढची राजकीय भूमिका घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळेच संभाजीराजे आणि सावंत यांच्या भेटीत काय घडतयं याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. संभाजीराजे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर सावंत निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तानाजी सावंत हे फडणवीस सरकारच्या काळात मंत्री होते. 2019 च्या निवडणुकीत परांडा विधानसभा मतदारसंघातून ते जिंकले. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार राहूल मोटे यांचा पराभव केला होता. महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात सावंत यांचा समावेश न झाल्याने ते नाराज आहेत. त्यामुळेच ते शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. परंतु, ते नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या काळात आमदार तानाजी सावंत यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. फडणवीस यांच्या भेटीसाठी सावंत ताटकळले होते. ही भेट सहजासहजी झाली नव्हती. राजकीय मध्यस्थीनंतर सावंत यांना फडणवीस भेटीचे दरवाजे खुले झाले होते. फडणवीस सावंत भेटी झाली होती.