जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आजारी मुलाला दुचाकीवरून घेऊन जाताना दुचाकी चिखल्यात रुतल्याने चिमुकल्याने दुचाकी वरच प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लखमापूर या गावातून समोर आली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
औरंगाबादमध्ये रस्ताच नसल्यामुळे एका चिमुरड्याचा हकनाक बळी गेला आहे. गंगापूर तालुक्यातील लखमापुर येथे राहणाऱ्या 8 वर्षीय कृष्णा परदेशी याच्या पोटात दुखू लागल्याने त्याचे वडील बाबूलाल परदेशी त्याला दुचाकीवरून गंगापूर येथे घेऊन जात होते. मात्र, जाताना खराब रस्त्यावर चिखल झाल्यामुळे दुचाकी त्यात फसली. तासभर अथक परिश्रम करून देखील मोटरसायकल चिखलातून काही केल्या निघत नव्हती.
अखेर उपचाराअभावी दुर्दैवाने त्यांच्या मुलाने त्यांच्या डोळ्यासमोर प्राण सोडले. या घटनेनंतर संपूर्ण गावात यंत्रणा राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. लोकशाहीतील लज्जास्पद घटना, राज्यकर्त्यांनो लाज वाटू द्या, स्वतःचे लेकरू जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्याचं दुःख काय असतं अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून सोशल मीडियावर उमटत आहेत. याबाबतचे वृत्त न्यूज 18 लोकमतने दिले आहे.