उस्मानाबाद | राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या गाडीवर गोळीबार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याच्या गाडीवर गोळीबार होण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत संबंधित पदाधिकारी थोडक्यात बचावला आहे. ही घटना फक्राबाद जिल्हा उस्मानाबाद येथून समोर आली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर असे की, उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन बिक्कड हे दिनांक 17 रोजी सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फक्राबाद इथून आपल्या जीपने पारा गावकडे निघाले होते. याच परिसरातील येताळवस्ती जवळ दोघा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीला हात केला, यावेळी त्यांच्या गाडीचा वेग कमी होताच, त्या दोन व्यक्तींनी पैकी एकाने बिक्कड यांच्या गाडीवर गोळीबार केला.

यावेळी बिक्कड यांनी गोळी चुकवली, दैव बलवत्तर म्हणून या हल्ल्यातून बिक्कड हे थोडक्यात बचावले आहेत. हल्ला होताच बिक्कड यांनी आपल्या गाडीचा वेग वाढवला. गाडी पुढे जातच पाठीमागून गोळी झाडण्यात आली होती, मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने या हल्ल्यातून बिक्कड हे बचावले. नितीन बिक्कड यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली.

अचानक झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्यामुळे नितीन बिक्कड यांचा रक्तदाब वाढला होता, त्यामुळे ते पारा येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झाले. दरम्यान या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक सुरेश ढवळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली.

दरम्यान याप्रकरणी शनिवारी पहाटे नितीन उंबरकर यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका संशयितास वाशी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून या घटनेबाबत सखोल चौकशी केली जात आहे.

दरम्यान पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वाशी पोलीस स्टेशनला शनिवारी सकाळी भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली आणि सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर हे करत आहेत.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष असलेले नितीन बिक्कड हे वाशी तालुक्यातील फक्राबाद गावचे सरपंच आहेत. बिक्कड यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे वाशी तालुक्यासह उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील मुख्य आरोपींना तााडीने अटक करण्याचे मोठे अव्हान वाशी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.