पाटोद्यातील पारधीवस्ती हल्ला प्रकरण चिघळले : आणखी एकाच मृत्यू, तर एका प्रकृती चिंताजनक, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पाटोदा तालुक्यातील पारनेर येथील पारधी वस्ती हल्ला प्रकरण आता चिघळले आहे. जमावाच्या हल्ल्यातील जखमी वृद्धाचा सोमवारी मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती बिघडली आहे. या प्रकरणातील आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

आतापर्यंत या घटनेत दोन बळी गेले आहे.दोन बळी जाऊनही प्रशासन मुख्य आरोपींना अटक करत नसल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी याप्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील पारनेर (ता. पाटोदा) येथील जमावाच्या हल्ल्यातील जखमी अभिमान पांढऱ्या काळे (वय ६०) यांचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता तर आठ जण जखमी झाले होते. त्यापैकी एका जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर प्रिन्स काळे (४) याची प्रकृती चिंताजनक आहे.

या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलिसांनी सात जणांना अटक केली. मात्र, दोघांचा जीव गेल्यानंतरही पोलीस मुख्य आरोपींना अटक करत नाहीत. वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झालेला असूनही त्याचा गुन्ह्यात उल्लेख नाही. दोन दिवस होऊनही पीडितेची वैद्यकीय तपासणी केली नाही असा आरोप करत महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडले.

महिलांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी या प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 

नातेवाइकांनी जमावाच्या हल्ल्यातील मृत मानू काळे (२) याचा मृतदेह तीस तासानंतरही ताब्यात घेतला नव्हता. मृतदेहाचे शवविच्छेदन करून ते शवागृहात ठेवण्यात आले आहे. सोमवारी मानू याचे आजोबा अभिमान काळे यांचाही मृत्यू झाल्याने दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला आहे. राजकारण्यांशी लागेबांधे असणाऱ्या मुख्य आरोपींना पोलीस अटक करत नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.