माळशिरस अपघात: देवदूतासारखा धावून आला इरफान; स्थानिकांच्या धाडसामुळे वाचले ७ जणांचे प्राण !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : माळशिरसच्या तांदुळवाडी येथे विहिरीत पिकअप कोसळून झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे ७ जणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आले आहे. या बचावकार्यात इरफान मुजावर या तरुणाने प्रसंगावधान राखून दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.(Irfan Mujawar heroic rescue in Pandharpur)

Malshiras Accident, Irfan rushed to rescue like an angel, 7 lives saved thanks to the locals' courage, Tandulwadi,Ranjani, pandharpur, solapur,

अपघात घडला तेव्हा इरफान मुजावर आपल्या वाहनाने पिकअपच्या पुढे जात होता. परंतू पाठीमागे अचानक मोठा आवाज येताच त्याने मागे पाहिले असता, पिकअप विहिरीत गेल्याचे दिसले. क्षणाचाही विलंब न करता इरफानने तातडीने वडिलांना फोन करून गावातील तरुणांना मदतीसाठी बोलावले आणि बचावकार्यासाठी थेट विहिरीत उडी घेतली.

पिकअप विहिरीत कोसळल्याने गाडीवरील कापडी शेड (फुगा) विहिरीत पसरला होता. त्यात अनेक जण अडकून पडले होते. इरफानने जीव धोक्यात घालून एका चिमुकल्याचे आणि अन्य तिघांचे प्राण वाचवले. इरफानची हाक ऐकताच तांदूळवाडीतील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावातील अनेकांनी कोणतीही भीती न बाळगता विहिरीत उड्या मारल्या. ग्रामस्थांच्या या तत्परतेमुळे आणि मदतीच्या प्रयत्नांमुळे एकूण ७ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.

Malshiras Accident, Irfan rushed to rescue like an angel, 7 lives saved thanks to the locals' courage, Tandulwadi,Ranjani, pandharpur, solapur,

मी रस्त्याच्या बाजूने जात होतो. छोटा हत्ती पुढे जाताना मी पाहात होतो. छोटा हत्तीने एक दोन हेलकावे घेतले. त्यानंतर थेट विहिरीत जाऊन कोसळल्याचेही इरफान याने सांगितले.

या अपघातामध्ये संदीप व बालाजी बावचे यांच्या मातोश्री इंदुबाई दशरथ बावचे (वय ६०) तसेच संदीप यांची पत्नी अश्विनी संदीप बावचे (वय २७), मुलगा संस्कार संदीप बावचे (वय १४), मुलगी संस्कृती संदीप बावचे (वय १४), बालाजी यांची पत्नी पूजा बालाजी बावचे (वय २७) आणि मुलगा समर्थ बालाजी बावचे (वय ६ महिने) तर त्यांचे नातेवाईक अमोल सातोरे यांच्या पत्नी पूजा अमोल सातोरे (वय २७), मुलगा आरव अमोल सातोरे (वय ८) अशा आठ व्यक्तींचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

इरफान मुजावर आणि तांदूळवाडीच्या ग्रामस्थांनी वेळेवर धाव घेत मदत केली नसती, तर मृतांचा आकडा आणखी वाढला असता. या धाडसी बचावकार्याची सध्या संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे.

नेमकी घटना काय ?

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा माळशिरस (Malshiras) तालुक्यात भीषण अपघात (Accident) झालाय, म्हसवड – पंढरपुर (Mhaswad Pandharpur) मार्गावरील तांदुळवाडीत (Tandulwadi) भरधाव पिक अप विहीरीत कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने महाराष्ट्र हादरला असून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुर तालुक्यातील रांजणी गावातील एक कुटूंब सिद्धनाथाच्या दर्शनासाठी म्हसवडला गेले होते. दर्शनानंतर ते पिकअपने गावाकडे परतत होते.  माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे त्यांच्या गाडी थेट विहीरीत कोसळण्याची भीषण दुर्घटना घडली.चालकाचं पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन रस्त्याजवळील विहिरीत जाऊन कोसळले. रस्त्यापासून अवघ्या १० फुटाच्या अंतरावर ही विहीर आहे. विहिरीला कोणतीही संरक्षण भिंत नव्हती. त्यामुळे पिकअप थेट विहिरीत कोसळली. या भीषण अपघात ८ जणांचा मृत्यू झाला, स्थानिक नागरिकांनी वेगाने बचावकार्य करत सात जणांचे प्राण वाचवले.