Maharashtra Corona Update | सोमवारी महाराष्ट्रात आढळले 33 हजार 470 नवे कोरोना रूग्ण तर ओमिक्रॉनचे 31 रूग्ण | 10 january 2022

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Maharashtra Corona Update | 10 January 2022 | महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. कालच्या पेक्षा आज रूग्णसंख्या काहीशी कमी झाल्याने राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात 10 रोजी 33 हजार 470 नवे रूग्ण आढळून आले आहे.  त्यानुसार राज्यातील सक्रीय कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता 2 लाख 6 हजार 46 इतकी झाली आहे.

राज्यात कोरोनाने मागील आठवड्यापासून हाहाकार माजवला आहे. सर्वच भागात रूग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना बरोबरच ओमिक्रॉनचेही रूग्ण वाढू लागले आहेत. राज्यात 10 रोजी तब्बल 33 हजार 470 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले तर 29 हजार 671 रूग्ण बरे होऊन घरी परतले. तर 8 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

राज्यात 10 रोजी ओमिक्रॉनचे 31 रूग्ण आढळून आले. यामध्ये पुणे मनपा 28, पुणे ग्रामीण 2 तर पिंपरी-चिंचवड 1 असे 31 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले. ओमिक्रॉनने पुणे व परिसराकडे मोर्चा वळवला आहे. यामुळे पुणेकरांचे टेन्शन वाढले आहे. राज्यात आजवर 1247 ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आलेत त्यातील 467 रूग्णांचे RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने घरी सोडून देण्यात आले. त्यानुसार राज्यात आज अखेर  सक्रीय ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 780 इतकी झाली आहे.

राज्यात आज अखेर 12 लाख 46 हजार 729 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2505 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के आहे तर मृत्यू दर 2.03 टक्के आहे. राज्यात आजवर 66 लाख 2 हजार 103 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने नाईट कर्फ्यू राज्यात लावला आहे. रात्री 11 ते 5  या वेळेत पुर्णपणे संचारबंदी असणार आहे. तर दिवसा जमावबंदी लागू असणार आहे. तसेच राज्यातील शाळा महाविद्यालये सरकारने बंद केली आहे. राज्यात आज अखेर 2 लाखांपेक्षा अधिक सक्रीय रूग्ण आहेत. एकट्या मुंबईत लाखाच्या आसपास सक्रीय रूग्ण आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू बिघडू लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज 244 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर 31 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या आता 1306 झाली आहे.