Kolhapur Violence News : छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात दोन गटांत तुफान राडा, दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि… सिध्दार्थनगर भागात नेमकं काय घडलं ? वाचा संपुर्ण घटनाक्रम
Kolhapur Violence News : सामाजिक समता आणि न्यायाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या (shahu maharaj) कोल्हापुरात सामाजिक ऐकोपा बिघडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शाहू महाराजांचा विचार येथील जनता विसरत चालली की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणातून कोल्हापुरात (kolhapur) नेहमी राडा होताना दिसत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) तोंडावर कोल्हापुरातील सिध्दार्थनगर (Sidharthnagar) भागात दोन गटांत मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. यावेळी दगडफेक, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, करण्यात आली. कोल्हापुरात हिंसाचारात (Violence) अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. कोल्हापुरात रात्री नेमकं काय घडलं ? पाहूयात संपुर्ण घटनाक्रम. (Sidharthnagar Kolhapur Violence latest news today)

सिद्धार्थनगर कमानीसमोर लावलेला फलक व झेंड्यावरून दोन गटांत रात्री तुफान राडा झाला. दोन्ही गट हत्यारांसह एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीत दोन पोलिसांसह सात जण जखमी झाले. प्रचंड गोंधळ, आरडाओरडा आणि त्यातच वीज खंडित झाल्याने गदारोळ उडाला. या चौकातील झेंडा फाडल्याच्या अफवेने या गोंधळात आणखी भर पडली. लक्ष्मीपुरी पोलिसांचा अपुरा पोलिस फाटा दोन्ही जमावांमध्ये अडकला. तीन तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती, सिद्धार्थनगर कमानीजवळ आज (ता. २२) दुपारी एका मंडळाने वर्धापन दिनाचा फलक उभा केला होता. त्याठिकाणी ध्वनिक्षेपक जोडण्यासह विद्युत रोषणाई करण्याची तयारी सुरू होती. याची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर हे त्याठिकाणी आले, ‘बाजूलाच सर्किट बेंच असल्याने कोणत्याही प्रकारची ध्वनियंत्रणा लावता येणार नाही, त्याला आम्ही परवानगी देणार नाही’, असे सांगून ते काम बंद पाडले. सिस्टीमचे साहित्यही ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, गृह पोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला.
सायंकाळी पुन्हा तयारी…
पोलिसांनी समज देऊनही संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांची छायाचित्रे असलेला मोठा फलक सिद्धार्थनगर कमानीजवळ उभा केला. ध्वनिक्षेपक लावून त्यासमोर नाचण्याचा काहींनी प्रकार सुरू केला. त्याचबरोबर समोरील एका खांबावरील फलाकाला हार घालून दुसऱ्या गटाला चितावणी देण्याचा प्रकार करण्यात आला. यामुळे सिद्धार्थनगर परिसरातील तरुण गटागटाने एकत्र येऊ लागले, तशी परिस्थिती बिघडू लागली. रात्री नऊच्या सुमारास दोन्ही गटांनी एकमेकांसमोर येत खुन्नस देण्याचा प्रकार केला. मंडळातील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण कोणीही ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर साडेनऊच्या सुमारास दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ सुरू केल्याने तणावात आणखीनच भर पडली.
दगडफेक, वाहनांची तोडफोड…
तरुणांच्या दोन्ही गटांकडून रात्री साडेनऊच्या सुमारास एकमेकांवर थेट दगडफेक करण्यास सुरुवात झाली. सीपीआर चौकाकडून छत्रपती शिवाजी पुलाकडे जाणारी अनेक वाहने भर चौकात सुरू असलेला प्रकार पाहून जागेवरच थांबली. जमाव हातात काठ्या, शस्त्रे घेऊन एकमेकांच्या दिशेने सरसावल्याने पादचाऱ्यांसह, वाहनधारकांचा थरकाप उडाला. मिळेल त्या दिशेने त्यांनी पळ काढला. जमावाने सिद्धार्थनगर कमान राजेबागस्वार दर्गा परिसरातील अनेक वाहनांची तोडफोड केली.

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचा फौजफाटा या जमावासमोर अत्यंत अपुरा पडला. पोलिस निरीक्षकांसह अनेक अंमलदार विना हेल्मेट धाडसाने जमावावर चालून गेले. झाडाच्या फांद्या, काठ्या अशा अपुऱ्या साहित्यासह पोलिस जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत होते. अशातच जमावाने टेम्पो उलटवून पेटवून दिला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आसपासच्या घरातून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, याठिकाणी उभ्या असलेल्या पाच मोटारींसह, एक रिक्षाची जमावाने तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले.
जखमी पोलिसांची नावे
दगडफेकीत सद्दाम महात (वय ३४), निहाल शेख (वय २३), जरियाब इनामदार (वय ३९), अशपाक शब्बीर नायकवडी (वय २६), इक्बाल सरकवास (वय ४२) यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे अंमलदार आबिद मुल्ला जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. रात्री उशिरा आणखी जखमी उपचारासाठी दाखल करण्याचे काम सुरू होते.
अधीक्षकांसह अधिकारी दाखल
घटनेचे गांभीर्य पाहून पोलिस अधीक्षक गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार, शहर उप-अधीक्षक प्रिया पाटील, शाहूवाडीचे उपअधीक्षक आप्पासो पवार, करवीरचे उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक संतोष डोके, सुशांत चव्हाण, संजीवकुमार झाडे, नंदकुमार मोरे, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ आदींसह शहरातील चारही पोलिस ठाण्यातील मुख्यालयातील दंगल काबू पथकाने घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला.
जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न
सिद्धार्थनगर कमानीपर्यंत आलेला जमाव वाढू लागला. यामध्ये महिलावर्गाचाही मोठा सहभाग होता. त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याने तणावात भर पडत होती. या जमावाला शांत करण्यासाठी पोलिस अधीक्षक गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार, गृहपोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत पुढे आले. गेले काही दिवस या चौकात फुटबॉल खेळण्यावरून काही तरुण वारंवार त्रास देत असल्याच्या तक्रारी यावेळी महिलांनी पोलिसांसमोर मांडल्या. तसेच कमानीजवळ एक ध्वजही काढल्याचे तरुणांकडून सांगण्यात आले. त्यांची समजूत घालत काढलेला ध्वज पुन्हा त्याजागी लावण्यात आला. यानंतर जमावाने घोषणा आणि टाळ्या देत पोलिसांनी दाखवलेल्या सामोपचाराचे कौतुक केले. संबंधित वादग्रस्त फलकही पोलिसांनी उतरवला.
कायदेशीर कारवाईचे आश्वासन
आज दुपारपासून चौकात झालेल्या विविध तणावग्रस्त प्रकाराची माहिती पोलिसांनी जाणून घेतली. मुख्य चौकात गेल्या काही दिवसांपासून जो प्रकार सुरू आहे. त्याचीही गंभीर दखल घेतली जाईल. प्रत्येक दोषीला शोधून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही, असे पोलिस दलातर्फे उपअधीक्षक सावंत यांनी जमावाला आश्वासन दिले. त्यामुळे जमाव शांत झाला. त्यांना आपापल्या घरी जाण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात येत होती. तब्बल अडीच तासानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले.
रात्रभर बंदोबस्त…
चारही पोलिस ठाण्यासह, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, राखीव पोलिस दल, दंगल काबू पथक असा सुमारे तीनशे पोलिसांचा फौजफाटा सिद्धार्थनगर चौकात तैनात होता. त्यामुळे या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. तणावग्रस्त परिस्थितीमुळे रात्री उशिरापर्यंत सीपीआर चौकातून छत्रपती शिवाजी पुलाकडे जाणारी वाहतूक शहर वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडस् लावून अन्य मार्गाने वळवली.
सोशल मीडियावर वॉच
दगडफेक सुरू असताना परिसरातील काही तरुणांनी व रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी या घटेनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. काहींनी हे व्हिडीओ व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. यातून अफवा पसरून परिस्थिती बिघडू नये, याची दक्षता घेत पोलिसांनी यासंबंधी सायबर पोलिसांना अलर्ट केले. सोशल मीडियावर कोणी व्हिडिओ व्हायरल केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे संकेत अधीक्षक गुप्ता यांनी दिले.
सात वर्षांपूर्वी आठवण…
सात वर्षांपूर्वी दोन समाजांत झालेल्या दंगलीचे पडसाद कोल्हापुरात उमटले होते. त्यावेळीही सिद्धार्थनगर चौकात दगडफेकीसह एकामेकांवर चाल करण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांसह अनेक जण या दगडफेकीत जखमी झाले होते. त्याची आठवण आजच्या प्रकारामुळे पुन्हा शहरवासीयांना झाली.
पंचनाम्यासह कारवाई सुरू
रात्री बाराच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू केले. त्याचबरोबर उपलब्ध होणाऱ्या माहितीआधारे दगडफेक, तोडफोड व जाळपोळ करण्याचा शोध पोलिसांनी सुरू केला. त्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली. त्याचबरोबर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.