khairi Dam News : खैरी धरणाने रचला इतिहास ! ३५ वर्षांत जे कधी घडलं नाही ते २०२५ मध्ये घडलं, सर्व रेकॉर्ड मोडीत!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : जामखेड तालुक्यातील खैरी धरणाने यंदा मोठा इतिहास रचला. १९९० ते २०२५ या ३५ वर्षांतील आपले सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. गेल्या ३५ वर्षांत जे कधी घडलं नाही ते २०२५ मध्ये घडलं. खैरी धरणातून २३ सप्टेंबर रोजी १९ हजार ८०४ इतका विसर्ग झाला. हा विसर्ग धरणाच्या आजवरच्या इतिहासातील एकाच दिवसांतील सर्वांत मोठा विसर्ग ठरला. सप्टेंबर महिन्यांत धरणाच्या सांडव्यातून एकुण ५२ हजार ५०६ क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे. हाही विक्रम खैरी धरणाने यंदा नोंदवला आहे. आज (४ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजेपर्यंतच्या ताज्या अपडेट्स नुसार खैरी धरणातून ४५८ क्युसेक विसर्ग सुरु आहे.

Khairi Dam Jamkhed, Khairi Dam created history, What had never happened in 35 years happened in 2025, breaking all records,

जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा खैरी मध्यम प्रकल्प खर्डा भागातील सातेफळ वाकी परिसरात आहे. या भागातील खर नदीवर १९७८ साली खैरी धरणाच्या निर्मितीला प्रारंभ झाला.१२ वर्षानंतर १९९० साली धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. खैरी धरणाची लांबी १२१० मीटर व उंची १८.९१ मीटर इतकी आहे.तर सांडव्याची लांबी ११० मीटर आहे. हे मातीचे धरण असून त्याची साठवण क्षमता अर्धा टीमसी (५३३.६० द.ल.घ.फु) इतकी आहे.गेल्या ३५ वर्षांत खैरी धरण १६ वेळेस भरले असून यामध्ये ऑगस्ट महिन्यात ही धरण फक्त चार वेळेस हे भरले आहे.

खैरी धरणाच्या विसर्गाचा इतिहास काय ?

१९९० साली खैरी धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.पहिल्याच वर्षी (१० ऑक्टोबर १९९०) धरणातून ३ हजार क्युसेक विसर्ग झाला होता. आठ वर्षांनंतर हा रेकॉर्ड ब्रेक झाला. ८ सप्टेंबर १९९८ या दिवशी ३ हजार ६०० क्युसेक विसर्ग झाला. हा रेकॉर्ड ब्रेक व्हायला पुन्हा आठ वर्षे लागली. २२ सप्टेंबर २००६ या दिवशी ४ हजार ५०० क्युसेक विसर्ग झाला. त्यानंतर हा रेकॉर्ड दहा वर्षाने मोडला. २४ सप्टेंबर २०१६ या दिवशी ४७५० क्युसेक विसर्ग झाला. हा रेकॉर्ड मोडायला ९ वर्षे लागले. २०२५ मध्ये आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. खैरी धरणातून एकाच दिवसांतील सर्वात मोठ्या विसर्गाचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित झाला. १९ हजार ८०४ इतका विसर्ग २३ सप्टेंबर २०२५ रोजी झाला आहे, अशी माहिती खर्डा सिंचन शाखेचे गणेश काळे यांनी दिली.

सप्टेंबर २०२५ मध्ये इतिहास घडला

खैरी धरणाच्या ३५ वर्षांच्या इतिहासातील सप्टेंबर २०२५ हा महिना ऐतिहासिक ठरला. सप्टेंबर महिन्यांत खैरीच्या पाणलोट क्षेत्रात तुफान अतिवृष्टी झाली. यामुळे धरणात पाण्याची प्रचंड आवक झाली. यामुळे धरणाच्या सांडव्यातून प्रचंड विसर्ग झाला. यामध्ये २२ सप्टेंबर रोजी ११ हजार ७४५ क्युसेक, २३ सप्टेंबर रोजी १९ हजार ८०४ क्युसेक, तर २७ सप्टेंबर रोजी १८ हजार ९३७ क्युसेक या तीन दिवशी सर्वाधिक विसर्ग सुरु होता. ३५ वर्षांच्या वाटचालीत २३ सप्टेंबर २०२५ हा दिवस ऐतिहासिक ठरला. या दिवशी खैरी धरणाने १९ हजार ८०४ क्युसेक विसर्ग करत इतिहास रचला आणि आपले सर्व रेकॉर्ड मोडीत काढले.

एकाच महिन्यात सर्वाधिक विसर्ग

खैरी धरणाच्या ३५ वर्षांच्या इतिहासात १८ वेळेस सांडव्यातून पाणी वाहिलेले नाही. परंतु यंदा अनेक विक्रम प्रस्थापित झाले. धरणातून यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबर २०२५ या महिन्यात ५२ हजार ५०६ क्युसेक विसर्ग झाला. यापुर्वी एकाच महिन्यात इतका मोठा विसर्ग होण्याची घटना घडली नव्हती. संपुर्ण पावसाळ्यात सर्वाधिक विसर्ग होण्याची घटना सन २०१० साली घडली होती. त्यावेळी ६ ऑगस्ट २०१० ते ५ डिसेंबर २०१० या कालावधीत ४६ हजार ७३० क्युसेक विसर्ग झाला होता. हा रेकॉर्ड पंधरा वर्षानंतर मोडला. एकाच महिन्यात ५० हजार क्युसेक पाणी खैरी धरणाच्या सांडव्यातून वाहून गेले. सध्या धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने जामखेड तालुक्यात मोठा हाहाकार उडवून दिला. बालाघाट डोंगर रांगेच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीचा सर्वाधिक प्रकोप दिसून आला. या भागातील सर्वच लहान मोठ्या नद्यांना महापुर आला. खर्डा भागातील अनेक गावांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली होती. सिना, विंचरणा व खैरी नदीला महापुर आला होता. नदीकाठची अनेक गावे पाण्याखाली गेली होती. परांडा तालुक्यातील अनेक गावांना खैरीच्या महापुराचा फटका बसला.गेल्या पंधरा दिवसांत पावसाने जामखेड तालुक्याचे संपुर्ण चित्रच बदलून टाकले. त्याने होत्याचे नव्हते करून टाकले. अतिवृष्टीमुळे जामखेड तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. खैरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने मोठा विध्वंस केला आहे.

हवामान बदलामुळे पावासाचे प्रमाण बदलले

कायम दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या जामखेड तालुक्यातील खैरी मध्यम प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य कुठलाही मोठी सिंचन प्रकल्प नाही.तालुक्यात खैरी मध्यम प्रकल्प वगळता इतर लहान मोठे तलाव आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे दरवर्षी हे प्रकल्प शंभर टक्के भरतातच असे नाही. पण बदलत्या जागतिक हवामानाचे दुष्परिणाम दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान ठरताना दिसत आहेत. कारण या भागात पडणाऱ्या पावसाने आपले रूपच बदलले आहे. वार्षिक सरासरी कशीबशी ओलांडणाऱ्या या भागात अचानक अतिवृष्टीने चित्र बदलून टाकले आहे.

जिथे सरासरी न ओलंडणारा पाऊस या भागात महापुर घेऊन आला. निसर्गाच्या या प्रकोपाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला. हवामान बदलामुळे पावासाचे प्रमाण बदलले आहे. आगामी काही वर्षांत याचा मोठा फटका संपूर्ण जामखेड तालुक्याला बसताना दिसणार आहे हे मात्र निश्चित!