जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड पंचायत समितीच्या सहा गणांसाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आणि गेल्या तीन वर्षांपासून पंचायत समितीचे कारभारी होण्यासाठी इच्छूक असलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा फैसला झाला. यात काहींना लाॅटरी लागली आहे तर काही जणांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

जामखेड पंचायत समितीसाठी जवळा, अरणगांव, खर्डा, दिघोळ, साकत आणि शिऊर असे सहा पंचायत समिती गण आहेत. या सहा गणांसाठीची आरक्षण सोडत आज १३ ऑक्टोबर रोजी जामखेड तहसील कार्यालयात पार पडली. प्रांताधिकारी नितीन पाटील व प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पांडळे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यावेळी अनेक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.
जामखेड पंचायत समिती आरक्षण खालील प्रमाणे
जवळा : अनुसूचित जाती महिला
अरणगाव : ओबीसी महिला
दिघोळ – सर्वसाधारण महिला
साकत – सर्वसाधारण
खर्डा – सर्वसाधारण
शिऊर- सर्वसाधारण
येत्या तीन महिन्यात पंचायत समिती निवडणूकीचा धुराळा रंगणार आहे. ऐन कडाक्याच्या थंडीत जामखेडचे राजकारण तापताना दिसणार आहे. पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. या पदासाठी सर्वाधिक चुरशीची आणि काट्याची टक्कर होताना दिसणार आहे. अरणगाव गण ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने सर्वाधिक चुरशीची लढत या गणात होणार आहे.
जामखेड पंचायत समितीसाठी पुर्वी चार गण होते. यंदा सहा गण झाले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप विरुध्द राष्ट्रवादी असा थेट सामना रंगताना दिसणार आहे. इतर राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरताना दिसणार आहेत. या पक्षांसाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी असणार आहे. भाजप व राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या अधिक आहे. या पक्षांना बंडखोरीचा सर्वाधिक धोका आहे. निष्ठावंतांना न्याय देताना दोन्ही पक्षांची मोठी कसरत होणार आहे.