- Advertisement -

अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवला जाणार कोरोनामुक्तीचा हिवरे बाजार पॅटर्न !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव संपवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजनांची गती वाढवली आहे. सर्वसमावेशक प्रयत्नांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता गावपातळीवर काळजी घेतली जात असून प्रत्येक गावात हिवरे पॅटर्न राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. (Hivare-bajar-pattern-to-be-implemented-in-every-village-in-ahmednagar-district)

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी त्यांनी वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना आणि त्याची तालुका व ग्रामपातळीवर होत असलेली अंमलबजावणी याबाबत संवाद साधला. यावेळी आदर्श गाव समितीचे अध्यक्ष तथा हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि पद्मश्री पोपटराव पवार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिनांक १३ आणि १४ मे रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्याशी दिवसभरात दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला होता. यावेळी आदर्श गाव हिवरे बाजारने कोरोना मुक्तीसाठी गावामध्ये केलेल्या उपाययोजना, रुग्णांचे विलगीकरण याची माहिती श्री. पवार यांनी सर्व सरपंच आणि ग्रामसस्तरीय अधिकारी यांना दिली होती. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी हाच हिवरे बाजार पॅटर्न जिल्ह्यातील सर्व गावात राबविण्याचे ठरविले असून तशा सूचना आज त्यांनी सर्व तहसीलदार आणि तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या,

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या संकल्पनेवर आधारित माझे गाव माझी जबाबदारी आणि माझी सुरक्षितता माझी जबाबदारी या संकल्पना गावपातळीवर राबवाव्यात. कोविड प्रसार रोखण्यासाठी गावातील शंभर टक्के कुटुंबांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यासाठी गावातील स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आणि गावातील तरुण स्वयंसेवकाचा गट याची मदत घ्यावी. कोरोना प्रतिबंधक व उपचारासाठी गावात तरुण स्वयंसेवकांची पथके तयार करुन त्याद्वारे सर्वेक्षणापासून कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही करावी.

लक्षणे दिसू लागताच तपासणीची वाट न पाहता तात्काळ अशा व्यक्तीस विलगीकरण कऱण्यात यावे आणि तपासणीअंती अशी व्यक्ती बाधित आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात अथवा रुग्णालयात दाखल करण्यात यावे. गावात एखाद्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्यास तात्काळ हेल्पलाईन १०८ क्रमांकावर संपर्क करुन रुग्णवाहिका उपलब्ध करुन घ्यावी. गावातील दूधसंकलन केंद्रे, किराणा, धान्य दुकान, विविध कार्यकारी सेवा सोसायटी अशा गावातील गर्दी होणाऱ्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होईल, याच्या उपाययोजना कराव्यात. एखाद्या कुटुंबातील सदस्य बाधित आढळल्यास त्याच्या कुटुंबाच्या आवश्यक दैनंदिन कामांत स्वयंसेवकांची मदत घ्यावी. गावातील गरजू नागरिकांना ग्रामनिधीतून सुरक्षित मास्कचे वाटप करावे, गावातील पदाधिकाऱ्यांनी कोरोना बाधित रुग्णांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधण्यास प्रोत्साहन द्यावे. त्याने रुग्णांना मानसिक आधार मिळेल. गावातील एखादी व्यक्ती बाधित आ़ढळल्यास तशी माहिती ग्रामसुरक्षा प्रणालीवर देण्यात यावी. लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आणण्यासाठीचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.

गावपातळीवर या सूचनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी या सूचनांचे परिपत्रक सर्व ग्रामपंचायतींना पाठविण्यात आल्याचे ते म्हणाले. सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी सर्व गावांमध्ये याची अंमलबजावणी होईल, याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.याशिवाय, कोरोना रुग्णवाढीचा वेग रोखण्यासाठीच्या उपाययोजना, ब्रेक दि चेन अंतर्गत करावयाची कार्यवाही, चेहऱ्यावर मास्क असणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे या कोरोना रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधितांपासून संसर्ग रोखण्यासाठी सर्वेक्षण पथकांद्वारे घरोघऱी सर्वेक्षण करुन बाधितांना तात्काळ उपचारांसाठी दाखल केले जाणे आवश्यक असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

कोरोना उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण सुरु असले तरी वाढत्या रुग्णसेवेमुळे त्यावर ताण येऊ नये यासाठी प्राथमिक पातळीवरच सर्वेक्षणाचा वेग वाढवून बाधितांना शोधण्याची मोहिन गतिमान करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.