महा-डीबीटी अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – कृषी सहसंचालक मोहन वाघ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । खरीप हंगाम 2022 साठी शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी उपयोगी असलेले विविध यंत्रे, औजारे या घटकांचे अनुदान महा-डीबीटीद्वारे कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गेत देण्यात येते. या कृषी यांत्रिकीकरण योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

कृषी विभागाने ‘महाडीबीटी’ पोर्टलवर ‘शेतकरी योजना’  या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत कृषी यांत्रिकीकरण या योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत ‘महाडीबीटी’ पोर्टल ही एकात्मिक संगणक प्रणाली विकसित केलेली आहे. या योजनेअंतर्गेत शेतीच्या कामांसाठी उपयोगी असलेले विविध यंत्रे, औजारे या घटकांचे अनुदानाबरोबरच इतरही यंत्रे, औजारे शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहेत.

शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना मागील 6 महिन्याच्या आतील जमिनीचा 7/12, 8 अ, बँक पासबुक सत्यप्रत, आधार कार्डची सत्यप्रत स्वत:च्या मोबाईलवरुन महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावी, अशी माहिती वाघ यांनी दिली आहे.