जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. धावत्या एसटी बसमध्ये मद्याच्या नशेत असलेल्या एका गुंड प्रवृत्तीच्या तरूणाने शेजारी बसलेल्या दिव्यांग महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची धक्कादायक घटना करंजी शिवारात घडली. एवढ्यावरच न थांबता, या प्रकाराचा जाब विचारणाऱ्या महिला आणि सहप्रवाशांनाच त्याने शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे समोर आले आहे.

अखेर पीडित महिलेने धावत्या बसमधूनच ‘डायल ११२’ वर संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पाथर्डी पोलिसांनी तातडीने करंजी येथे धाव घेत संबंधित तरुणाला बसमधून खाली उतरवत ताब्यात घेतले.
उमापूर येथून बसमध्ये चढला तरुण
धाराशिव जिल्ह्यातील कळंब-पाथरी येथून पिंपरी-चिंचवडकडे जाणारी एसटी बस पाथर्डी-अहिल्यानगर मार्गे पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून एक दिव्यांग महिला आपल्या मुलीसह प्रवास करत होती.
बस उमापूर येथे आल्यानंतर सुमारे २६ वर्षीय तरुण बसमध्ये चढला. तो मद्याच्या नशेत असल्याने त्याला स्वतःचा तोलही व्यवस्थित सांभाळता येत नव्हता. काही वेळाने तो बसमधील दोन सीटच्या मधील पॅसेजमध्येच झोपी गेला.
अचानक उठला अन् थेट महिलेच्या अंगावरच…
बस पाथर्डीहून पुढे करंजी शिवारात पोहोचल्यानंतर संबंधित तरुण अचानक उठला आणि त्याने शेजारी बसलेल्या दिव्यांग महिलेच्या अंगावर लघुशंका केली. अचानक घडलेल्या या किळसवाण्या प्रकारामुळे महिला आणि तिची मुलगी प्रचंड घाबरल्या.
हा प्रकार पाहून बसमधील इतर प्रवासीही संतप्त झाले. त्यांनी संबंधित तरुणाला जाब विचारत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपली चूक मान्य करण्याऐवजी त्याने उलट पीडित महिला आणि सहप्रवाशांनाच शिवीगाळ करत दमदाटी सुरू केल्याचे सांगण्यात आले.
महिलेने केला ‘डायल ११२’; पोलिसांची तातडीने धाव
बसच्या आत तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच पीडित महिलेने प्रसंगावधान राखत ‘डायल ११२’ वर फोन केला आणि पोलिसांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने करंजी येथे पोहोचले. पोलिसांनी एसटी बस थांबवून संबंधित मद्यपी तरुणाला खाली उतरवले आणि ताब्यात घेतले.
मित्रांना बोलावून पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही संबंधित तरुणाचा उद्दामपणा थांबला नसल्याचे समोर आले आहे. त्याने फोन करून काही स्थानिक मित्रांना घटनास्थळी बोलावून घेत प्रवाशांना पुन्हा दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
धावत्या सार्वजनिक बसमध्ये एका दिव्यांग महिला प्रवाशासोबत घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधित तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.