जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात सोमवारी मोठी उलथापालथ झाली. आमदार रोहित पवार गटाच्या संचालकाने राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जामखेड बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघाचे संचालक राहुल बेदमुथा यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी अ.नगर येथे भाजपात जाहीर प्रवेश केला. रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

जामखेड बाजार समितीची सत्ता एकहाती भाजपच्या ताब्यात जाण्यासाठी आजची घडामोड महत्वाची मानली जात आहे. भाजपचे बाजार समितीतील संख्याबळ आता 11 झाले आहे. बेदमुथा यांच्या भाजपा प्रवेशामुळे बाजार समितीतील राजकीय समीकरणे बदलले आहेत. लवकरच बाजार समितीवर भाजपची एकहाती सत्ता स्थापन होताना दिसणार आहे.

या पक्ष प्रवेशावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक सचिन (नाना) घुमरे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, संचालक अंकुश ढवळे, बापु माने सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.