जामखेड टाइम्स वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात चोरट्यांनी तब्बल दीड लाख रुपयांच्या शेळ्यांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे.अवघ्या महिनाभरापूर्वी तीन बेरोजगार तरुणांनी एकत्र येत सुरू केलेल्या शेळीपालन व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला असून, या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. प्रकरणी पाटोदा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे की, पाटोदा तालुक्यातील आमीर शेख, राम पवार व शंकर कोल्हे या तिघा बेरोजगार तरूणांनी एकत्रित येत महिनाभरापूर्वी बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. यासाठी तिघांनी एकत्रितपणे चार लाखांची गुंतवणूक करत १८ शेळ्या आणि १५ पिल्ले आणले होते. त्यांनी हा व्यवसाय वांजराफाटा ते येवलवाडी या दरम्यान बंद असलेल्या हाॅटेल राहूल (राम पवार यांच्या मालकीच्या) या ठिकाणी सुरू केला होता.
८ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी हाॅटेल राहूल येथील लोखंडी जाळी तोडून दीड लाख रूपये किमतीच्या सात शेळ्या चोरून नेल्या. घटनेवेळी हाॅटेल मालक राम पवार व राखणदार असे दोघे झोपले असताना चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत शेळ्यांवर डल्ला मारला. घटनेची माहिती उघड होताच राम पवार यांनी आमीर शेख यांना माहिती कळवली. शेख यांनी पाटोदा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस नाईक पवळ व घोडके यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. राम पवार यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पाटोदा परिसरातील तिघा तरूणांनी एकत्रित येत नव्या व्यवसायात नशिब आजमवण्याची सुरू केलेल्या धडपडीला चोरट्यांनी गालबोट लावल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. स्वयंरोजगारासाठी धडपड करणाऱ्या होतकरू, कष्टकरी तरूणांचे मनोबल खच्ची होऊ नये यासाठी पाटोदा पोलिसांनी तातडीने चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.