ते दोघे एकाच मंचावर शेजारी बसले, ना पाहिलं, ना बोलले पण राजकीय टोलेबाजीचा बार उडवला

 

बीड : राज्याच्या राजकारणात बीडच्या मुंडे बंधू भगिनीचे नाव अग्रस्थानी आहे. मात्र दोघांचे पक्ष वेगवेगळे असल्याने अनेकदा मुंडे बंधू-भगिनी मधील मतभेद समोर आल्याचं दिसून येतं. मात्र परळीच्या (Parali) एका कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे (beed MP Pritam Munde) हे दोघेही एकाच व्यासपीठावर दिसून आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या निमित्त होतं परळी शहरातील स्वर्गीय मनोहरपंत बडवे सभागृह लोकार्पण सोहळा तसेच विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे.

परळीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, आणि खासदार प्रीतम मुंडे या तिघांचीही नावं होती. त्यामुळे हे तिघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित राहतील का ? याची उत्सुकता होती. पंकजा मुंडे (Pankaja mundhe) परदेशात असल्याने त्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या नाहीत मात्र खासदार प्रीतम मुंडे व मंत्री धनंजय मुंडे हे दोन्ही नेते कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. मुंडे भावंडात यावेळी संवाद होईल का? ते ऐकमेकांना बोलतील का ? याची उत्सुकता परळीकरांना होती.

दोघेही एकाच मंचावर पण संवाद नाही

या कार्यक्रमात प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही शेजारी शेजारी बसले होते. दोघांमध्ये संवाद होईल अशी अपेक्षा होती परंत दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. मात्र दोघांनी केलेल्या भाषणाची मात्र जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान या कार्यक्रमात दोघा मुंडे बंधू-भगिनीची भाषणातून चांगलीच जुगलबंदी दिसून आली. प्रीतम मुंडे यांना या कार्यक्रमाला पोहोचण्यास उशीर झाला. त्यावेळी परळीच्या शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था सांगत खासदार मुंडे यांनी अप्रत्यक्षरीत्या शहरात संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल टीका केली. तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील खासदार प्रीतम मुंडे यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. परळीचा पायाभूत विकास सुरु आहे, त्यामुळे आमच्या ताईला इथे पोहोचण्यास उशीर झाला, असं धनंजय मुंडे म्हणाले.