Ashti : HIV ने विवाहित तरूणीच्या मृत्यूची अफवा आणि गावाने कुटूंबाला टाकले वाळीत, आष्टी तालुक्यातील घटनेने महाराष्ट्रात खळबळ !
Ashti : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. HIV मुळे विवाहित तरूणीचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आली. या अफवेमुळे एका कुटूंबाला अख्खा गावाने वाळीत टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे ही अफवा पसरवण्यात पोलिस व आरोग्य विभागाचा हात असल्याचा आरोप पिडीत कुटूंबाने केला. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. (Ashti News Today)

“आष्टी तालुक्यातील एका विवाहितेचा नुकताच मृत्यू झाला. पोटचा गोळा गेल्याच्या दु:खात असलेल्या माहेरच्या कुटूंबाला एका अफवेमुळे मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. पीडीत कुटूंबाने त्या अफवेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“विवाहित मुलीचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी झाली, तसंच गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकलं. कुणीही भेटायला जवळ येत नाही. आमच्यासोबतचे व्यवहारही लोकांनी थांबवले आहेत’, तसंच या आरोपांमुळे घरातल्या महिलेने दोन वेळा जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, असा दावा कुटुंबाने केला आहे.”
याप्रकरणी कुटुंबाने डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिपही दाखवली. ही ऑडिओ क्लिप पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे. तुमच्या मुलीला एचआयव्ही होता, तिच्या अंत्यविधीला जवळ ज्या व्यक्ती होत्या, त्यांची तपासणी करून घ्या, असं या ऑडिओ क्लिपमधली व्यक्ती म्हणत आहे. ही व्यक्ती पोलीस असल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.
मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशी अफवा पसरवल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. ‘आमची मुलगी गेली, पण जवळचे लोकही भेटायला आले नाहीत. या अफवेमुळे कुणीही आमच्याजवळ येत नाही. आरोग्य विभागाने खोटा अहवाल दिला आहे, सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून हे झालं आहे, आम्हाला न्याय द्या.’, अशी मागणी कुटुंबाने केली आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे.
पीडित कुटुंबाच्या आरोपावर बोलताना आष्टी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर पोलिसांना याबाबत विचारलं असता डॉक्टरांनी जे सांगितलं त्यासंदर्भात आमच्या कर्मचाऱ्यांनी समजवून सांगण्यासाठी हे सांगितलं, दुसरा कोणताही हेतू नव्हता, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.
मुलीला हा असला काही आजार झालाच नव्हता. ज्या दवाखान्यात ती उपचार घेत होती, त्या फाईल पाहून त्यांनी तसा अंदाज लावून आजार झाल्याचे कारण समोर आणले. शवविच्छेदन अहवालातदेखील असे काही समोर आले नाही. आमची आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने नाहक बदनामी केल्याने जगावे की मरावे, अशी अवस्था झाली आहे. गावात आमच्या सोबत कोणी बोलत नाही की घरीदेखील येत नसल्याचे मृत मुलीच्या कुटुंबाने सांगितले.