अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील एकाने तरी ‘महापशुधन एक्स्पो’ पाहण्यासाठी शिर्डीला यावे – खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांचे अवाहन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमांतून आणि आपले नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठ्या ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे.महापशुधन एक्स्पोचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. येत्या २४ ते २६ मार्च २०२३ या काळात होणारे ‘महापशुधन एक्सपो प्रदर्शन महाराष्ट्रासह देशाला दिशादर्शक ठरणार आहे.त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.
शिर्डी येथे होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या ‘महापशुधन एक्सपो च्या तयारीसाठी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या उपस्थितीत लोणी येथे बैठक पार पडली. या बैठकीला राहाता, संगमनेर, श्रीरामपूर आणि राहुरी येथील कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत खासदार विखे पाटील यांनी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनातील कार्यक्रमाची सविस्तर माहिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली. यावेळी विविध संस्थाचे पदाधिकारी आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार विखे पाटील म्हणाले की, देशातील १३ राज्यातील पशुपक्ष्यांच्या १५०० प्रजाती या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व पटवून देवून देशी गोवंशामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालनाद्वारे स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यायोगे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, दूध, मांस, अंडी उत्पादनास चालना देणे, जनावारांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, लिंग निश्चित केलेल्या विर्यमात्राचा कृत्रिम रेतन कार्यक्रमात वापर, वैरण उत्पादनास चालना देणे, मुरघास हायड्रोपोनिक अझोला तंत्रज्ञान यासारख्या विषयांबाबत पशुपालकांना प्रात्यक्षिकांसह या प्रदर्शनात तज्ज्ञांकडून होणारे मार्गदर्शन राज्यातून येणाऱ्या पशुपालकांना उपयुक्त ठरेलच परंतू अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी पर्वणी ठरणार असल्याचे ते म्हणाले.
शास्त्रोक्त पध्दतीने पशुपालन करण्यासाठी आवश्यक यंत्रे उपकरणे तसेच पशुसंवर्धनाशी निगडीत बाबीसाठीच्या उत्पादनाचे ४६ एकराच्या क्षेत्रामध्ये स्टाॅल उभारण्यात येणार असल्याचे सांगत विखे पुढे म्हणाले की, देशातील सर्वात मोठ्या महापशुधन एक्स्पो चे यजमान पद शिर्डीकडे असल्याने प्रत्येक गावांतून महीला बचत गटांबरोबरचं इतरही महीला,शालेय विद्यार्थी यांच्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे, १०० बसेसची सुविधा पुरविण्यात येणार आहे.
शिर्डी मतदारसंघासोबतच राहाता, संगमनेर,राहुरी आणि श्रीरामपूर भागातील कार्यकर्त्यांनी गावपातळीवर नियोजन करावे, सकाळच्या सत्रात विद्यार्थी आणि दुपारच्या सत्रात महीला असे नियोजन करताना युवकांनी स्वयंसेवक म्हणून आपले योगदान द्यावे. जिल्ह्यातील प्रत्येक कुंटुंबातील एकाने तरी ‘महापशुधन एक्स्पो आणि यानिमित्ताने होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सव,महीला बचत गटांचे दालन बघावे असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी केले आहे.