उध्दव ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंप : मोठ्या नेत्याने धरली भाजपची वाट

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेत उभी फूट पडल्यापासुन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटाला रोज काहीना काही हादरे बसत असल्याचे दिसत आहे. ठाकरे गट मोठ्या अडचणींना सामोरे जात असतानाच आज ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला. ठाकरे गटातील माजी आमदाराने आज भाजपात प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Another political earthquake in Uddhav Thackeray group, Former MLA Avadhoot Tatkare joins BJP

राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्या कुटुंबातील गृहकलहाला कंटाळून तटकरे यांचे पुतणे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र शिवसेनेत त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले नाही, त्यातच सध्या शिवसेनेत उफाळून आलेल्या फुटीनंतर पक्ष कमकुवत झालेला आहे. अश्या अवस्थेत पक्षाला उभारी देण्यासाठी भूमिका देण्याऐवजी स्वता:चा राजकीय पुनर्वसनासाठी माजी आमदार अवधूत तटकरे यांनी थेट अस्त्र बाहेर काढले.

अवधूत तटकरे हे रायगड जिल्ह्यातील रोहा – श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी आज भाजपात प्रवेश करत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. भाजपात प्रवेश केल्यानंतर तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अवधूत तटकरे म्हणाले की, बऱ्याच दिवसापूर्वी मी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली होती. यावेळी आमचे भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात निर्णय झाला होता. भाजपची सध्या देशात एकहाती सत्ता आहे. त्यामुळे जिल्ह्याचा या मार्फत विकास होणार आहे. भाजपमध्ये प्रवेशासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता, असंही माजी आमदार अवधुत तटकरे म्हणाले.

कोण आहेत अवधूत तटकरे

अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणे आहेत. 2014 ला ते रोहा -श्रीवर्धन मतदारसंघात आमदार होते. 2019 त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. 2019 ला या मतदारसंघातून आदिती तटकरे आमदार झाल्या होत्या. आता 2024 ला आदिती तटकरे विरूद्ध अवधूत तटकरे असा बहिण भावंडांमध्ये सामना होऊ शकतो.