अहमदनगर पाठोपाठ राज्यात आणखी एक अग्नीतांडव: इमारतीला लागलेल्या भीषण आगीत दोन ठार

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नीतांडवाचे प्रकरण ताजे असतानाच राज्यातून आणखी एक आगीची घटना समोर आली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.मुंबईतून ही घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना वाढल्या आहे. या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शनिवारी राज्यात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अग्नीतांडवाच्या घटनेत 11 बळी गेले. या घटनेने राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाच मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील भागात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झालाय.

मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील मथुरादास रोडवर असलेल्या हंसा हेरिटेज या निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावर अचानक ही आग लागली. या आगीत सुमारे 7 जण अडकले होते, त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.ही घटना शनिवारी रात्री आठ वाजता घडली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आग लागली तेव्हा काही लोक आत अडकले होते, त्यापैकी काही जखमी झाले आणि दोन जणांचा मृत्यू झाला. कांदिवलीतील आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला, एक 89 वर्षांची आहे, तर दुसरी महिला 45 वर्षांची आहे.

अहमदनगर जिल्हा रूग्णालयात भीषण अग्नीतांडव

दरम्यान शनिवारी सकाळी अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात अग्नीतांडव झाले. रूग्णालयातील ICU वार्ड अग्नीतांडवात जळून खाक झाला. याठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचार सुरू होते. भीषण आगीच्या घटनेत 11 जणांचा बळी गेलाय. तर अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीचे कारण अजूनही समोर आलेले नाही. या घटनेबद्दल देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.