जामखेड : अहिल्यादेवींनी रयतेला न्याय देणारं राज्य केलं, त्यांचा हाच विचार घेऊन महायुती सरकारचा कारभार सुरू – उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं कार्य इतिहास घडवणारे आहे. त्यांनी राज्य कारभार करताना जनतेच्या हृद्य सिंहासनावर अधिराज्य केलं.देशभरातील तीर्थक्षेत्रांचा विकास केला. त्या कुशल शासक होत्या.त्यांची निष्पक्षता आणि उत्कृष्ट प्रशासनाची उदाहरणे आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक आहेत. त्यांनी रयतेला न्याय देणारं राज्य केलं. त्यांचा हाच विचार घेऊन महायुती सरकारचा कारभार सुरु आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चोंडी येथे बोलताना केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी १५ मे २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र चोंडीला भेट दिली. सकाळी ११ वाजता त्यांचे चोंडीत आगमन झाले होते. यावेळी प्रा राम शिंदे समर्थक, शिवसेना पदाधिकारी, चोंडी ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासन यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळास भेट देत अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी अहिलेश्वर मंदिरास भेट दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळास भेट दिल्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी राम शिंदे यांच्या पत्नी आशाताई राम शिंदे व आई भामाबाई शिंदे यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी शिंदे कुटुंबियांच्या वतीने जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे यांनी उपसभापती निलमताई गोऱ्हे यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती व पुस्तक भेट देत यथोचित सन्मान केला. यावेळी निलमताई गोऱ्हे यांनी सभापती प्रा राम शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे, मातोश्री भामाबाई शिंदे व शिंदे कुटूंबातील इतर सदस्यांशी आपुलकीने दिलखुलास संवाद साधला. शिंदे कुटूंबियांशी संवाद साधल्यानंतर उपसभापती निलमताई गोऱ्हे कर्जतच्या दिशेने रवाना झाल्या.

यावेळी प्रियंका भांड, वर्षाराणी उबाळे, उषाताई भांडवलकर, माजी सरपंच अभिमन्यू सोनवणे,अशोक देवकर, शिवाजी भांड, संतोष कुरडूले,दिनेश शिंदे,आलेश शिंदे, महादेव शिंदे, मिलिंद देवकर, सोमनाथ शिंदे सह आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या की, विधानपरिषद सभापती रामभाऊ शिंदे यांच्या पुढाकाराने चोंडीत सहा मे रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत जनतेच्या आणि नगर जिल्ह्याच्या विकासासाठी खुप चांगले निर्णय घेण्यात आले.या निर्णयांमध्ये महिलांसाठी आदिशक्ती योजनेचा देखील समावेश आहे. परंतू एकल महिलांच्या संदर्भात अजून सर्वेक्षण होणं बाकी आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडीत तीर्थक्षेत्र विकास काम सुरु आहे. सरकारने ६८१ कोटी रूपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. यातून अनेक महत्वाची कामे होणार आहे. देशभरातील महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून चोंडी नावारूपास येण्यास मदत होणार आहे. चोंडी तिर्थस्थळ विकासासाठी माझे पुर्ण सहकार्य राहिल, असा शब्द यावेळी निलमताई गोऱ्हे यांनी यावेळी बोलताना दिला.
तत्पुर्वी उपसभापती निलमताई गोऱ्हे यांचे चोंडीत आगमन झाल्यानंतर सरपंच अविनाश शिंदे यांनी त्यांचे चोंडी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केले.
