शेतकऱ्याची कुकडी विभागाकडून फरफट, वाचा कर्जतमधील एका शेतकऱ्याची कहाणी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | कुकडी कालव्यात संपादित झालेल्या क्षेत्राचा मोबदला देण्यासाठी कुकडी विभाग कर्जतने संबंधित शेतकऱ्यास दिलेला धनादेश खोडा-खोड असल्याच्या कारणाने बँकेने नाकारला. तो धनादेश पुन्हा बदलून मिळावा यासाठी कुकडी विभागाला दिला असता आता त्या शेतकऱ्यास हेलपाटे मारावे लागत असल्याने मोठा मनस्ताप घडत असल्याची तक्रार कांतीलाल भिसे या शेतकऱ्याने निवेदनाद्वारे केली आहे.

मौजे बेनवडी ता कर्जत येथील गट नंबर ९४ मध्ये कांतीलाल सीताराम भिसे यांची शेतजमीन आहे. यातील ०.०९ हे.आर जमीन कुकडी कालव्यासाठी संपादित झाली आहे. सदर संपादित क्षेत्र भिसे यांनी शासनास खरेदी करून दिली आहे. त्यामुळे त्याचा मोबदला आपणास मिळावा हा आपला हक्क आहे. अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर कुकडी विभाग कर्जतचे लिपिक सुहास भाकरे यांनी वरील संपादित जागेच्या मोबदल्यात महाराष्ट्र बँक शाखा कर्जत या शाखेचा चेक क्रमांक २१३८०९ अक्षरी रुपये ३ लाख २६ हजार ९३७ रुपयांचा धनादेश दि ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दिला.

मिळालेला धनादेश भिसे यांनी दोनच दिवसाने १७ नोव्हेंबर २१ रोजी कर्जत स्टेट बँक शाखेत रक्कम वटविण्यासाठी भरला असता धनादेशवर दिनांक असलेल्या १० अंकावर पेनाने अनेक वेळा गिरवल्या असलेच्या कारणाने खाडाखोड म्हणून तो धनादेश स्टेट बँकेने परत केला.

भिसे यांनी तो खाडाखोड असलेला धनादेश लिपिक भाकरे यांच्याकडे विना अट कोणतीही लिखापडी न करता परत केला. भाकरे यांनी दोन-चार दिवसांत नव्याने धनादेश देतो असे म्हंटले. मात्र त्या नंतर आजतागायत भिसे यांना धनादेश दिला नाही. फोन केला असता भाकरे कॉल उचलत नाही. तसेच आज देतो. चार दिवसांनी देतो म्हणत वेळ मारून नेतात. कार्यलयात समक्ष भेट घेतल्यास उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने आपली अडवणूक होत असल्याची तक्रार कांतीलाल भिसे यांनी कुकडी विभागास दिलेल्या निवेदनात केली आहे. सदर निवेदनाची प्रत त्यांनी आ रोहित पवार, जिल्हाधिकारी अहमदनगर, प्रांताधिकारी कर्जत, तहसीलदार कर्जत आणि पोलीस निरीक्षक कर्जत यांना दिली आहे.