अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त रोहित पवारांनी केली ‘या’ उपक्रमाची घोषणा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : राज्यात वेगवेगळ्या कारणांनी सोशल मिडीयासह वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चेत राहत असलेल्या आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मतदारसंघासाठी एका नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. या नव्या उपक्रमांमुळे रोहित पवार हे पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आले आहेत. रोहित पवार यांच्या पुढाकारातून वैयक्तिक पातळीवर ही योजना राबवली जाणार आहे. या विषयीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन हे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थतर्फे करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्याने निराधार झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे ‘आधार’ या उपक्रमाच्या माध्यमांतून निराधार महिलांना स्वयं रोजगार सहाय्य, प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात राबवला जाणार आहे.

कर्जत व जामखेड या दोन्ही  तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा विध्वंस घडवला आहे. यात अनेकांच्या घरातील कमवत्या व्यक्तींचा कोरोनामुळे दुदैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक महिला तसेच घरातील वयोवृध्द व्यक्ती निराधार झाल्या आहेत. या निराधारांना ‘आधार’ देण्यासाठी आ. रोहित पवार यांनी एका सामाजिक उपक्रमाची मतदारसंघात मोहिम हाती घेतली आहे.

सद्या कोरोनाचा काळ असल्यामुळे या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध घालण्यात आल्याने काही भागात रोजगाराची समस्या आहे. त्यामुळे या निराधार महिलांना घरबसल्या रोजगार देऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे, याकरिता आ. रोहित पवार हे या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. महिलांना शिलाई मशीन व पीठ गिरणी किंवा इतर छोटा घरगुती उद्योग मिळाल्यास त्यांची रोजगाराची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. तसेच महिला स्वावलंबी होऊन सक्षमीकरणाचा उद्देश साध्य होईल, या दृष्टीकोनातून ‘आधार’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.