जामखेड : सातबारा हाॅटेलच्या वेटरने केला तरूणाचा खुन, भरसकाळी घडलेल्या घटनेने खळबळ, घटनास्थळावरून आरोपीस अटक, जामखेड पोलिसांची कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरापासून जवळच असलेल्या शिऊरफाटा- काटेवाडी परिसरातील हाॅटेल सातबारा येथे भरसकाळी एका तरुणाचा खुन करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिस खुनाच्या कारणांचा वेगाने शोध घेत आहेत.

Murder incident at Hotel Satbara in early morning today, youth dies after being beaten by waiter, accused arrested, jamkhed crime news today, shiur fata katewadi, jyotiram kashid,

शिऊरफाटा- काटेवाडी येथील सातबारा हाॅटेलमध्ये काम करणार्‍या दिलीप सातपुते  या वेटरने सारोळा येथील ज्योतीराम काशिद (वय ३६) या तरुणाला लाकडी दांडक्याने डोक्यात, अंगावर बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरूण गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी,१८ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. या हत्येचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणी मयताच्या भावाने जामखेड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

मयताचा भाऊ लक्ष्मण श्यामराव काशीद, (वय ३०) याने जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, माझा भाऊ जोतीराम श्यामराव काशीद हा १७ ऑगस्ट रोजी सायकांळी ७/३० वाजेच्या सुमारास घरातून फोनवर बोलत बाहेर निघून गेला होता. परंतू तो रात्री घरी परतला नव्हता. आज १८ ऑगस्ट रोजी सकाळी ७/३५ वाजता मी भावास फोन लावला असता त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर माझा चुलत भाऊ महेश काशीद याने मला सकाळी ९/१७ वाजता फोन केला व सांगीतले की, हाॅटेल सातबारा येथे ज्योतीरामला मारहाण झाली आहे. आपल्याला तिथे जायचे आहे.

त्यानुसार मी, वडील चुलते, चुलत भाऊ असे  आम्ही पाच सहा जण घटनास्थळी पोहचलो असता माझा भाऊ रक्ताने माखलेला आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तो हाॅटेल सातबाराच्या काउंटरच्या उजव्या बाजुला असलेल्या बाजेच्या खाली पडलेला आम्हाला दिसला. यावेळी त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजुस गंभीर जखम झालेली दिसून आली व त्यातून जास्त रक्तस्राव झालेला दिसला. तेथे जवळच रक्ताने माखलेली लाकडी काठी दिसली.

त्यावेळी तेथे असलेला हाॅटेल सातबारावरील वेटर दिपक गुलाबराव सातपुते रा. मनमाड जि. नाशिक याने सांगीतले की, मी तुझा भाऊ जोतीराम यास काहीएक कारण नसताना त्याच्या डोक्यात काठीने मारले आहे असे त्याने आम्हाला सांगीतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनास्थळी मृत तरूणाचे कुटुंबिय आल्यानंतर जामखेड पोलिसांनी खाजगी रूग्णवाहिकेतून मयतास ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे औषध उपचाराकामी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ज्योतीराम काशिद तरुणाचा मृत्यू  झाला असल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.

मयताचा भाऊ लक्ष्मण काशिद यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिपक गुलाबराव सातपुते रा. मनमाड जि. नाशिक याच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 468 2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी हे करत आहेत.