जामखेड : श्रद्धेचा गैरफायदा! अष्टगंध लावण्याचा बहाणा करून वृद्ध शेतकऱ्याला लुटले; खर्डा बसस्थानकावरील धक्कादायक प्रकार
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : देवाचा अष्टगंध लावण्याचा बहाणा करून एका वृद्ध शेतकऱ्याला विश्वासात घेतले आणि गप्पांमध्ये गुंतवून त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना खर्डा बसस्थानक परिसरात घडली आहे. या धाडसी चोरीमुळे बसस्थानक परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील वाकी येथील नाना सिताराम धावडे (वय ६७) हे पत्नीसोबत शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. गुरुवारी (दि. १६) ते खर्डा येथे आठवडी बाजारासाठी आले होते. बाजारातील खरेदी आटोपल्यानंतर दुपारी सुमारे १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान ते गावाकडे जाण्यासाठी खर्डा बसस्थानकावर एसटीची वाट पाहत उभे होते.
अष्टगंध लावायचा बहाणा आणि चपळाईने लूट
धावडे बसस्थानकावर उभे असताना एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. “बाबा, देवाचा अष्टगंध लावा,” असे सांगत त्याने अष्टगंध लावण्याचा आग्रह धरला. बसस्थानकावर गर्दी असल्याचे सांगून आरोपीने त्यांना जवळच असलेल्या एका झाडाजवळ नेले. तेथे अष्टगंध लावल्यानंतर “मला लातूरला जायचे आहे, बस कुठे लागते?” अशी विचारणा करत आरोपीने त्यांना गप्पांमध्ये गुंतवले.
धावडे यांना काही समजण्याच्या आतच, आरोपीने त्यांच्या गळ्यातील २ ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम, कानातील २ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या काड्या आणि खिशातील ५ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून पळ काढला.
२५ हजारांचा ऐवज लंपास; खर्डा पोलिसांत गुन्हा दाखल
अचानक घडलेल्या या प्रकारानंतर धावडे यांनी बसस्थानक परिसरात आरोपीचा शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. काही वेळाने त्यांचा पुतण्या दिनेश धावडे तेथे भेटल्यानंतर त्याला घडलेला सर्व प्रकार सांगण्यात आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ खर्डा पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
या लुटीमध्ये ५ हजार रुपये रोख आणि ४ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी खर्डा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी करून आरोपीचा शोध घेतला जात आहे.