जामखेड : विजेचा खांब रोवताना भीषण अपघात, विजेचा शाॅक लागुन एका कामगाराचा मृत्यू; तर दोघे जण थोडक्यात बचावले, आनंदवाडी – लोणी फाटा हद्दीतील घटना
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील आनंदवाडी – लोणी फाटा हद्दीत विजेचे खांब रोवत असताना झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली. या अपघातात देवदैठण येथील गणेश दिलीप भोरे (वय ३५) या कामगाराचा विजेचा शाॅक लागुन मृत्यू झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आनंदवाडी हद्दीत (लोणी फाटा) वाकीच्या काॅलेज ऑफ फुड सायन्स टेक्नॉलॉजी काॅलेजच्या वीज जोडणीसाठी विजेचे खांब रोवण्याचे काम रविवारी सुरू होते. खर्डा ३३ केव्ही मेन लाईनच्या लगत हे काम सुरु होते. पोल रोवणारा ट्रॅक्टर उतारावरून घसल्यामुळे पोल ३३ केव्ही मेन लाईनच्या तारांना अडकला. यामुळे ट्रॅक्टरमध्ये करंट उतरला. ट्रॅक्टर मागे घेण्यासाठी गेलेल्या कामगार गणेश भोरे यांना विजेचा शाॅक लागला आणि त्यांचा मृत्यू झाला.तर ट्रॅक्टरजवळ असलेले इतर दोन कामगार सुदैवाने बचावले.
मयत गणेश भोरे हे महावितरणचे खर्डा येथील खाजगी ठेकेदार संतोष साबळे यांच्याकडे कामगार म्हणून काम करत होते. आई वडिलांना एकुलता एक असणाऱ्या गणेश भोरे यांच्या पश्चात वृध्द आई वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नातेवाईकांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणाबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत मयत गणेश भोरे यांच्या लहान मुलांना मदत करावी अशी मागणी केली आहे.

आनंदवाडी हद्दीत विजेचे पोल रोवण्याचे काम करण्यासाठी खाजगी ठेकेदाराने व संबंधित काॅलेज प्रशासनाने महावितरणची कसलीही परवानगी घेतली नव्हती अशी माहिती समोर येत आहे. सदर घटनेबाबत वाकीच्या काॅलेज ऑफ फुड सायन्स टेक्नॉलॉजी काॅलेजच्या प्रमुखांसह खाजगी ठेकेदाराविरुद्ध काय कारवाई होणार याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सदर घटनेमुळे रविवारी खर्डा ३३ केव्ही मेन लाईनचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे तालुक्यातील अनेक भागात वीज पुरवठा बंद होता. घटनेनंतर घटनास्थळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी. या घटनेप्रकरणी खर्डा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.