सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ५ वर्षांची चिमुकली उतरली मैदानात; जामखेडच्या ‘अबिरा’च्या फलकाने वेधले सर्वांचेच लक्ष

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि शिक्षण व पर्यावरणासाठी लढा उभारणारे समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी जामखेड शहरात मोर्चा आणि कडकडीत बंद पाळण्यात आला. जामखेडकरांनी अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, या संपूर्ण जनआंदोलनात एका ५ वर्षांच्या चिमुकलीने आणि तिच्या हातातील अत्यंत मार्मिक फलकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

5-year-old girl has stepped forward in support of Sonam Wangchuk, placard held by 'Abira' from Jamkhed has caught everyone's attention,

या मोर्चातील सर्वात भावनिक आणि विचार करायला लावणारा क्षण ठरला तो म्हणजे आपल्या भावी पिढीच्या सुरक्षेची हाक घेऊन रस्त्यावर उतरलेली लहान चिमुकली. ‘अबिरा बाळासाहेब घोडेस्वार’ असे या ५ वर्षांच्या चिमुकलीचे नाव असून, तिच्या हातात “I SUPPORT SONAM WANGCHUK SIR (Because My Future Is in Danger)” असा रोखठोक संदेश लिहिलेला फलक होता. निष्पाप डोळ्यांनी आणि हातात आपल्या भवितव्याची चिंता व्यक्त करणारा फलक घेऊन चालणाऱ्या या चिमुकलीच्या शांत पण प्रभावी संदेशाने सर्वांनाच अंतर्मुख होण्यास भाग पाडले.

माझे भविष्य धोक्यात…’ चिमुकलीचा शांत पण प्रभावी संदेश

“शिक्षण व्यवस्थेवरील आघात आणि विद्यार्थ्यांवरील अन्याय थेट पुढच्या पिढीचे भविष्य अंधारात ढकलत आहे, हाच जळजळीत इशारा अबिराच्या त्या एका फलकाने समाजाला दिला. अबिराचा हा भावनिक लढा पाहून प्रत्येक नागरिकाचा चेहरा भावी पिढीच्या सुरक्षेबद्दलच्या चिंतेने सुन्न झाला होता.

दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायकारक घटनांविरोधात पेटून उठलेल्या जामखेड शहराने गुरुवारी एका बाजूला तीव्र रोष व्यक्त केला, तर दुसऱ्या बाजूला ५ वर्षांच्या अबिराच्या रूपाने भविष्याच्या सुरक्षेसाठी एक सशक्त भावनिक साद घातली. अबिराच्या एका फलकाने समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धीला साद घातली. चिमुकल्या अबिराचा हा भावनिक सहभाग आज संपूर्ण तालुक्यात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरला आहे.