हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराजांना मारहाण, खर्डा पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : काही दिवसांपुर्वी एका महिलेसोबतच्या काॅल रेकॉर्डिंगमुळे राज्यात चर्चेत आलेले हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज पुन्हा एकदा एका प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. भल्या पहाटे त्यांना काही लोकांनी मारहाण केल्याची घटना जामखेड तालुक्यात घडली आहे. नाजूक प्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा जामखेड तालुक्यात आहे.

याबाबत सविस्तर असे की, बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज हे 29 रोजी जामखेड तालुक्यातील मोहरी येथील घुगेवस्ती येथे सुरू असलेल्या महादेव मंदिराचे काम पाहण्यासाठी आले होते. त्याच दिवशी मोहरी येथील बाजीराव गिते यांच्या घरामध्ये पहाटे दीड ते साडेपाच या वेळेत त्यांना मारहाण करण्यात आली.

याबाबत खर्डा पोलिस स्टेशनला बुवासाहेब खाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.यात म्हटले आहे की, जखमी फिर्यादी हे महादेव मंदीराचे काम पाहण्यासाठी घुगेवस्ती, मोहरी येथे गेले असता त्य़ाठिकाणी बाजीराव गिते,भिवा गोपाळघरे, अरूण गिते, राहूल संपत गिते रामा गिते यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना बाजीराव गिते याच्या घरामध्ये बोलावून घेवून आरोपी राहूल संपत गिते याने मोबाईल मधील फोटो दाखवून शिवीगाळ दमदाटी करून फिर्यादीच्या दोन्ही कानशिलात हाताने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी हे खाली पडले असता इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली.

त्यावेळी राहूल संपत गिते हा हातामध्ये सुताची दोरी घेवून फिर्यादीचे तोंडा भोवती फिरवून म्हणाला तुला फाशी देईल अशी धमकी दिली आहे. त्यानंतर पहाटे 05.30 वा राहुल गिते हा हातामध्ये कोयता घेवून व बाजीराव गिते हा लोखंडे पेरे घेवून फिर्यादीचे पुढे येवून तुझ्या अंगावरील सोने काढून दे नाहीतर तुला जिवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करून टाकू अशी धमकी देत फिर्यादीच्या ताब्यातील 13 लाख 60 हजार रूपये किमतीचे सोन्याच्या चैनी, अंगठ्या काढून घेतले असे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी बुवासाहेब खाडे महाराज जखमी असल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथील बडे हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हाँस्पिटलमधून जखमी बुवासाहेब खाडे महाराज यांचा जबाब प्राप्त झाल्यानंतर 3 ऑगस्ट 2022 रोजी रात्री उशिरा खर्डा पोलिस स्टेशनला मोहरी गावातील पाच जणांविरुद्ध कलम 327, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहेत.