संगीत विशारद परीक्षेचा निकाल जाहीर : मृदंग विशारद पदवी संपादन करणारा सारंग ढवळे ठरला हळगावमधील पहिला विद्यार्थी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत विशारद परीक्षेतील मृदंग या विषयात सारंग विठ्ठल ढवळे हा उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मृदंग विशारद ही पदवी संपादन करणारा सारंग ढवळे हा हळगावमधील पहिला विद्यार्थी ठरला आहे.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील सारंग ढवळे याने करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयात शिक्षण घेतले आहे. संगीत विशारद नाना पठाडे यांच्याकडे मार्गदर्शनाखाली त्याने मृदंगाचे शिक्षण घेतले. सात वर्षे तो या विषयाचे प्रशिक्षण घेत होता. सलग सात वर्षे परिक्षा दिल्यानंतर त्याने मृदंग विशारद ही पदवी संपादन केली आहे.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने नोव्हेंबर 2024 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये सारंग ढवळे याने संगीत विशारद परीक्षेत घवघवीत यश संपादन करत मृदंग विशारद ही पदवी संपादन केली आहे.
सारंग ढवळे हा नगर येथील न्यू लॉ कॉलेज याठिकाणी एलएलबी चे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या मृदंग विषयाच्या परीक्षा दिल्या. त्यात त्याने घवघवीत यश मिळवत मृदंग विशारद ही पदवी संपादन केली.
भजन, कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताहात सारंग ढवळे याच्या मृदंगाची साथ नामांकित कीर्तनकारांना लाभली आहे.सारंग याची कौटुंबिक पार्श्वभूमी वारकरी परंपरेची आहे. त्याच्या कुटूंबाचा आध्यात्मिक कार्यात नेहमी सहभाग राहिलेला आहे. अध्यात्मिक वातावरणात लहानाचा मोठा झालेल्या सारंगला अध्यात्माची गोडी लागली. विशेषता: अध्यात्मिक संगीताकडे त्याचा कल अधिक राहिला.याच आवडीतून तो आज मृदंग विशारद बनला आहे. त्याच्या घवघवीत यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे व हाळगाव ग्रामस्थांसह जामखेड तालुक्यातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.