जामखेड टाइम्स वृत्तसेवा : तुमचा ऊस जर नेला नाही तर माझ्या दारात येऊन बसा, तुमचा ऊस तोडायची आणि घालायची जबाबदारी माझी, मी सांगतो तुमचा ऊस नाही गेला तर त्याच्या बापात फरक, लैच जर टर्रीला लागला तर ह्याच्याच कारखान्यावर ऊस नाही घातला तर बापाचं नावच घेऊ नका, असे आक्रमक भाष्य करत आमदार प्रा.राम शिंदे यांनी कारखान्याआडून रोहित पवारांकडून सुरू असलेल्या दडपशाही, दमबाजी व हुकुमशाही कारभाराचा जोरदार समाचार घेतला.
साखर कारखान्याच्या आडून जामखेड तालुक्यातील ऊस उत्पादकांना सुरू असलेल्या दमबाजीवर आमदार प्रा.राम शिंदे शनिवारी आक्रमक होत आपली भूमिका मांडली. ऊस उत्पादकांनो काळजी करू नका, घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, तुमचा ऊस कारखान्याला घालायची जबाबदारी माझी, असे म्हणत त्यांनी ऊस उत्पादकांना मोठा दिलासा दिला.जामखेड तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन व संचालक यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ऊसउत्पादकांच्या प्रश्नांवर त्यांचा रुद्रावतार पहायला मिळाला. आमदार शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेला उपस्थित गावकारभार्यांनी जोरदार दाद दिली.
यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, जामखेड तालुक्यातील ऊस उत्पादकांना भयभीत केले जात आहे. साखर कारखान्याच्या आडून दमबाजी केली जात आहे. परंतू काळजी करू नका, तुमचा ऊस घालायची जबाबदारी मी घेतो. तालुक्याच्या आसपास अनेक कारखाने आहेत. त्यांच्या माध्यमांतून आपण ऊसाचे नियोजन करू, तुम्ही ऊसाची काळजी करू नका, राम शिंदेच्या मानेवर मान टाकून द्या, ज्याचा ऊस राहिल ना त्याने माझ्या दारात येऊन बसावं, ऊस तोडायची आणि घालायची जबाबदारी माझी आहे. भिऊ नका, अशी साद घालत त्यांनी ऊसउत्पादकांना दिलासा दिला.
साखर आयुक्त आणि सरकारची जबाबदारी ऊस गाळपाची आहे, मग तुम्ही कश्याला काळजी करता. उगाच कोणी नाटकं करू नका, ज्याला जायचं आहे त्याने विचारून जावं, उगचं गडी पेटवू नका, आपलं कसं होईल,आता काय करावं, असले धंदेच सोडून द्या, एकदा टाईट भूमिका घेतलीय ना? मग मागे हटू नका. मी सांगतोय ना काळजी करू नका, जर तुमचा ऊस नाही गेला तर बापात फरक, जर लैच टर्रीला लागला तर ह्याच्याच कारखान्यावर ऊस नाही घातला तर बापाचं नावच घेऊ नका, असे म्हणताच उपस्थितांनी जोरदार दाद दिली.