जामखेडची अतिक्रमण हटाव मोहिम वादात : गोरगरिबांच्या स्वप्नांवर वरवंटा, धनदांडग्यांवर बुलडोझर कधी? जनतेच्या मनातला संभ्रम प्रशासन कधी दुर करणार ?
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेडमधील बहुचर्चित अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर मुहूर्त लागला खरा; परंतु या कारवाईचा पहिला वरवंटा गोरगरीब टपरीधारकांच्या स्वप्नांवरच फिरवला गेला. बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ही मोहीम कशीबशी चालली आणि समर्थ हॉस्पिटलजवळ येताच तिला अचानक ‘गूढ ब्रेक’ लागला. पहिल्या दिवशी प्रशासनाने ‘सिंघमगिरी’ दाखवली पण दुसऱ्या दिवशी कारवाईचा बार अचानक फुसका निघाला. हातावर पोट असणाऱ्यांचे संसार उघड्यावर पाडून श्रीमंतांचे इमले वाचवण्यासाठी बुलडोझरचे ब्रेक जाम तर झाले नाही ना? असा जळजळीत सवाल संपूर्ण शहरभर चर्चिला जात आहे.
जामखेड शहराची जीवघेणी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी सकाळी १० वाजता बीड रोडवरील शासकीय दूध डेअरी परिसरापासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. तहसीलदार शितल सावळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे आणि पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्गाच्या गटारापासून दोन्ही बाजूंना सुमारे १० फुटांपर्यंतचे (३ मीटर) अतिक्रमण हटवण्यास धडक सुरुवात झाली. मोहिमेचा पहिला घाव बसला तो गोरगरिबांच्या छोट्या-मोठ्या टपऱ्यांवर! त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांचे १० फुटांपर्यंतचे बांधकाम हटवत ही मोहीम बुधवारी समर्थ हॉस्पिटलपर्यंत येऊन पोहोचली.
मंगळवारी आणि बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईचा ताळेबंद पाहिला, तर प्रशासनाचा दुटप्पी चेहरा स्पष्ट उघडा पडला आहे. समर्थ हॉस्पिटल पर्यंत काही मातब्बर धेंडांच्या आणि वजनदार प्रस्थापितांच्या पक्क्या व अवाढव्य बांधकामांवर थेट हातोडा टाकण्याचे धाडस यंत्रणेला दाखवता आले नाही. बड्यांच्या दारात केवळ थातुरमातुर देखावा करून कारवाई गुंडाळण्यात आली; तर दुसरीकडे कोणतीही सवलत न देता गोरगरिबांच्या रोजीरोटीवर मात्र थेट वरवंटा फिरवण्यात आला. समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नर भागातील बड्या धेड्यांवर बुलडोझर कधी चालणार ? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी नेमक्या कोणत्या मलईदार दबावापुढे झुकले आहेत ? आर्थिक तडजोड तर झाली नाही ना ? अशी उघड चर्चा आता बीड रोडवर रंगली आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली केवळ सामान्य आणि दुर्बल घटकांना टार्गेट करून बड्या धनदांडग्यांना वाचवण्याचा अथवा त्यांना सोयीस्कर सवलत देण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याची जोरदार कुजबुज शहरात सुरू आहे. नियमानुसार कोणाचीही गय न करता सरसकट अतिक्रमण काढण्याची मागणी आता जोर धरत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जनतेच्या संतापाचा उद्रेक होण्याची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.जामखेड शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईचा ॲक्शन प्लॅन प्रशासनाने जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासन याबाबत कधी स्पष्टीकरण देणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
एकिकडे अतिक्रमण हटाव मोहिमेत संभ्रमाचे वातावरण असताना, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता सुजित चेमटे हे बीड रोडवरील एका हॉटेलमध्ये निवांत आराम फरमावत असल्याचे समोर आले. दुपारपासून कारवाई का बंद ठेवली, असा जाब विचारणाऱ्या पत्रकारांवर चेमटे यांनी अरेरावी केली. “मी तुम्हाला बांधील नाही, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही; जे विचारायचे ते ज्योती शिंदे यांना विचारा,” अशी बेजबाबदार भाषा वापरून त्यांनी तिथून पळ काढला.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाशी मुजोरपणे वागणाऱ्या या अधिकाऱ्याविरोधात पत्रकारांनी तातडीने प्रांताधिकारी नितीन पाटील व तहसीलदार शितल सावळे यांची भेट घेऊन तीव्र निषेध नोंदवला असून, त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी लावून धरली आहे.
दुसऱ्या दिवशी मोहीम थंडावण्यामागे भूमी अभिलेख आणि महामार्ग विभागाच्या मोजणीतील तफावतीचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, हा निव्वळ बड्यांना अभय देण्याचा बनाव असल्याचे सांगत स्थानिक व्यापाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.पूर्वी झालेली अधिकृत मोजणीच ग्राह्य धरून गटारापासून १० फुटांची मर्यादा सर्वांसाठी स्पष्ट करावी. मोजणी अधिकृत आणि पारदर्शक असेल, तर व्यापारी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतील. शहराच्या विकासाला विरोध नाही; मात्र गरिबांना रस्त्यावर आणायचे आणि धनदांडग्यांना अभय द्यायचे, हा पक्षपाती कारभार खपवून घेतला जाणार नाही, असा पवित्रा व्यापारी बांधवांनी घेतला आहे.
गोरगरिबांच्या डोळ्यांतील अश्रूंची पर्वा न करता त्यांच्यावर बुलडोझर चालवणाऱ्या प्रशासनाची हिंमत वजनदार प्रस्थापितांच्या दारात का गळून पडली? बुलडोझरचा ब्रेक कोणी व का जाम केला? बड्या धेंडांसमोर नांगीच टाकायची होती, तर गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्याचा अट्टाहास कशासाठी केला? कायदा व नियम सर्वांसाठी समान असताना त्याची अंमलबजावणी करताना दुजाभाव का? या प्रश्नांनी शहरात काहूर माजवले आहे. जनतेच्या संतापाचा भडका उडण्याआधी प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
गुरूवारी, अतिक्रमण हटावची मोहीम वेगाने सुरू राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतू गेल्या दोन दिवसांत जे काही संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेय ते दुर करण्यासाठी प्रशासनाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.