काँग्रेस राष्ट्रवादीविरोधात शिवसेना आमदार तानाजी सावंत भडकले, म्हणाले ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी पाहिली होती का?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । महाविकास आघाडीतील नाराजी आज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात जोरदार हल्लाबोल केला. सावंत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत असंतोष असल्याचे समोर आले आहे. सावंत यांनी घेतलेल्या भूमिकेवर महाविकास आघाडीत काय पडसाद उमटतात याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

यावेळी पुढे बोलताना आमदार तानाजी सावंत म्हणाले की, शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे. शिवसैनिकांच्या मनगटातली रग वेगळीच आहे. कुठल्याही पक्षाने आजमवण्याचा प्रयत्न करू नये आणि भविष्यातही करू नये. दरम्यान, राष्ट्रवादी, काँग्रेसवाले फक्त आमच्याकडे बघून हसतात आणि सर्व आमदारांची चेष्टा करतात, असं माजी मंत्री तानाजी सावंत म्हणाले.

निधीवाटपावरून तानाजी सावंतांची नाराजी

अधिवेशन पार पडल्यानंतर गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये असं समजतंय की, शिवसेनेला कुठेतरी दुय्यम वागणूक मिळत आहे. हे अर्थसंकल्पातून रिफ्लेक्ट झालेलं आहे. अर्थसंकल्पात ५७ ते ६० टक्के बजेट हे राष्ट्रवादीला दिलं जातं. तर ३० ते ३५ टक्के बजेट हे काँग्रेसला दिलं जातं. तसेच शिवसेनेला १६ टक्के बजेट दिलं जातं. परंतु १६ टक्के बजेट मधील उच्च आणि तंज्ञ शिक्षण मंत्री आमचे असल्यामुळे पगारावरतील ६ टक्के दिलं जातंय. पण विकासासाठी काय?,विकासासाठी फक्त १० टक्के दिलं जातं, अशी नाराजी सावंतांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेसवाले आमच्याकडे बघून हसतात

आमच्या विभागामध्ये ज्या पद्धतीचे पदाधिकारी पाहीजेत ते आम्हाला मिळत नाहीत. आम्हाला यांच्याकडं बघावं लागतं आणि हे गालातल्या गालात हसत आमच्या सर्व आमदारांची चेष्टा करतात. त्यामुळे या पक्षांवर आमची प्रचंड नाराजी आहे. हे जाहीरपणे आम्ही तुम्हाला सांगू शकतो.

ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी पाहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली. तुम्ही त्यांच्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असे ठरलेलं असताना असं का होतं? आमच्या नादी लागू नाका. तुम्ही शंभर मारले तर आमचा एकच दणका बसेल की तुम्हाला आईचं दूध आठवेल. आमच्या सहनशीलतेचा अंत तुम्ही बघू नका, असं तानाजी सावंत म्हणाले.

आमची घडी विसकटण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य देखील कोटी कोटी रुपये निधी आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. जे आमदाराला मिळत नाही आणि खासदाराचा विषयचं येत नाही. आमच्यामुळे हे सत्तेमध्ये आले आणि आमच्या मांडीला मांडी लावून बसले. परंतु आमची घडी विसकटण्याचा प्रयत्न तुम्ही करता. हे खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट बघत आहोत. जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करू. आमच्या संयमाची तुम्ही परीक्षा करू नका. जोपर्यंत साहेबांचा आदेश येत नाही. तोपर्यंत शांत आहोत, असं सावंत म्हणाले.