कलगीतुरा : सचिन पोटरेंवर राष्ट्रवादीच्या काकासाहेब कोल्हेंचा जोरदार पलटवार !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा। सत्तार शेख । कर्जत  व जामखेड या दोन्ही तालुक्यातील 7 तीर्थक्षेत्रासाठी 4 कोटीचा प्रलंबित निधी मंजूर झाला आहे. त्याच्या श्रेयावरूनच राष्ट्रवादीत आणि भाजपात चांगली जुंपली आहे. दोन्ही पक्षांकडून आमच्यामुळेच निधी आला असा दावा करण्यात येऊ लागला आहे. मतदारसंघात भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगू लागला आहे.आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडू लागल्याने राजकीय वातावरण जोरदार तापू लागले आहे.

विकास कामांवरून सध्या भाजप व राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई जुंपल्याचे दिसत आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या काळात मंजुर झालेल्या कामांचे श्रेय आमदार रोहित पवारांकडून घेतले जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी केल्यानंतर जामखेड तालुका राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब कोल्हे यांनी पोटरे यांचा समाचार घेत जोरदार पलटवार केला आहे.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी विरोधात जोरदार हल्लाबोल करत 4 कोटींचा निधी माजी मंत्री राम शिंदे यांच्यामुळेच आल्याचा दावा केला. यावर आता राष्ट्रवादीकडून उत्तर आले आहे.

भाजपची लाचारी करून स्वतःचा स्वार्थ साधला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडीया सेलचे जामखेड तालुकाध्यक्ष काकासाहेब कोल्हे यांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी केलेल्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ज्या सचिन पोटरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असताना भाजपची लाचारी करून स्वतःचा स्वार्थ साधला त्यांनी आमच्या नेत्यावर टीका करून आपली पातळी दाखवू नये असा टोला कोल्हे यांनी लगावला आहे.

राम शिंदे यांनी मागील 10 वर्षात मतदारसंघातील लोकांना फक्त कागदावर कामे मंजूर दाखवून लोकांची दिशाभूल केलेली आहे, सध्या फक्त काम कागदावर न दाखवता प्रत्यक्ष काम करून जनतेला आधार देण्याचं काम रोहित दादा करत आहेत, नेमकं हेच भाजपच्या काही स्वार्थी लोकांना देखवत नाही म्हणून त्यांच्या जीवाचा आटापिटा चालला आहे अशी खोचक टिका कोल्हे यांनी केली आहे.

सूर्यावर थुंकल्यावर थुंकी आपल्याच अंगावर येणार ….

कर्जत जामखेड मतदारसंघातील जनता खूप हुशार आहे भाजपवाल्यांनी कितीही बिनबुडाचे आरोप केले तरी कर्जत नगरपंचायतला राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे 17 पैकी 17 जागा निवडून देऊन भाजपला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय जनता राहणार नाही असे टीकास्त्र सोडत सूर्यावर थुंकल्यावर थुंकी आपल्याच अंगावर येणार हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे असा जोरदार टोला काकासाहेब कोल्हे यांनी लगावला आहे.

भाजप व राष्ट्रवादीत विकास कामांच्या श्रेयवादावरून रंगू लागलेला हा कलगीतुरा राजकीय वातावरण तापवणारा आहे. यातूनच रोहित पवार व राम शिंदे या दोन्ही नेत्यांमधला संघर्ष अधिकच उफाळून येऊ लागला आहे.

भाजपचे सचिन पोटरे काय म्हणाले होते ?

कर्जत जामखेड मतदारसंघाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित टप्प्याचा विकास करण्यासाठी माजी तत्कालीन पर्यटनमंत्री प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या व त्यांनीच भूमिपूजन करून उद्घाटन केलेल्या श्री.सद्गुरू गोदड महाराज मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह मतदारसंघातील इतर  तीर्थक्षेत्रांचा विकास आराखड्यात समावेश झाला होता. त्यानुसारच मतदारसंघातील 7 तीर्थक्षेत्रांसाठी 4 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे श्रेय हे माजी मंत्री राम शिंदे यांचेच आहे असा दावा भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी केला होता.

विद्यमान आमदारांनी उरलेल्या अडीच वर्षांत माजी मंत्री राम शिंदे यांनी मंजुर केलेली परंतू राजकीय कुरघोडीत सुरू न झालेली कामे सुरू करण्याचे धाडस दाखवावे असे अव्हान देत आपल्या राजकारणाच्या ” नव्या पर्वाची ‘ दहशत   दादागिरी , व दडपशाहीची कर्जत जामखेडच्या जनतेने कर्जत नगरपंचयात निवडणुकीत झलक पाहिली असून यामुळे नोकरदार वर्ग व सर्वसामान्य जनता भयभीत झाली असून या नव्या पर्वाला जनता नक्कीच निकालाच्या धक्क्याने जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही असे म्हणत सचिन पोटरे यांनी आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला होता.