स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादीची मोठी घोषणा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका संपताच महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी हाती घेतली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज एक मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही, हा प्रश्न जोवर सुटत नाही तोवर निवडणूका पुढे ढकला अशी मागणी ओबीसी नेते आणि राजकीय पक्ष करताना दिसत आहेत. परंतू राज्यात 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत.

या निवडणुकीत ओबीसी समाज आपल्यापासून दुर जाऊ नये यासाठी राजकीय पक्षांकडून पाऊले उचलली जाऊ लागली आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा जोवर सुटत नाही तोवर राष्ट्रवादी पक्षाकडून उगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयानुसार अगामी निवडणुकांमध्ये एकुण उमेदवारांंपैैकी 27 टक्के ओबीसी उमेदवार दिले जाणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली आहे.

जयंत पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.