ब्रेकिंग न्यूज : उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय भूकंप, जामखेडचे तालुकाप्रमुख शिवबंधन तोडून भाजपमध्ये दाखल होणार !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आमदार रोहित पवार यांच्या मनमानी व एकाधिकारशाही कारभारामुळे रोहित पवारांच्या पक्षातून बाहेर पडलेले पक्षाचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटालाही मोठे भगदाड पडणार आहे. पक्षाचे जामखेड तालुकाप्रमुख संजय काशिद हेही आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल होणार आहेत. येत्या २३ रोजी ते ठाकरेंचे शिवबंधन तोडून भाजपवासी होणार आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार रोहित पवारांविरोधात लाट निर्माण झाली आहे. ज्या नेत्यांनी मागच्या निवडणुकीत पवारांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं होतं, ते सर्व नेते आता रोहित पवारांविरोधात एकवटले आहेत. पवार यांनी मागील पाच वर्षांत मनमानी कारभार केला.
त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक नेते पवारांविरोधात बंड करू लागले आहेत. या बंडाची पहिली सुरुवात राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी केली. त्याआधी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व काँग्रेसने त्यांच्या विरोधात मोहिम उघडली होती.
जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर गेल्या महिनाभरापासून मतदारसंघात जनसंपर्क दौरा राबवत जनतेशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. येत्या २३ सप्टेंबर रोजी प्रा राळेभात हे आपल्या समर्थकांसह भाजपात दाखल होणार आहेत.
एकिकडे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात हे भाजपात प्रवेश करणार असल्याने रोहित पवारांच्या अडचणी वाढलेल्या असतानाच आता महाविकास आघाडीतून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जामखेड तालुकाप्रमुख संजय काशिद हेही आता शिवबंधन तोडून भाजपात दाखल होणार आहेत. त्यांचाही प्रवेश २३ रोजी मुंबईत होणार आहे.
मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्यासह जामखेड शहराध्यक्ष सुरज काळे व तालुक्यातील संपूर्ण कार्यकारिणीचा भाजपात प्रवेश होणार आहे. ठाकरे गटात झालेला हा राजकीय भूकंप रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा आहे.
रोहित पवारांविरोधात मतदारसंघात सध्या तीव्र लाट निर्माण झाली आहे. अनेक मोठे नेते पवारांच्या हुकुमशाही कार्यपध्दतीला कंटाळून त्यांना सोडून चालले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत.