कर्जत जामखेड मतदारसंघासाठी 20 कोटींचा निधी मंजुर, आमदार प्रा.राम शिंदे आणि खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । आमदार प्रा.राम शिंदे आणि खासदार डॉ.सुजय विखे-पाटील या जोडगोळीच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघात विकासाचा नवा झंझावात निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल 20 कोटी रूपयांच्या निधीस राज्य सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. तसा शासन निर्णय ग्रामविकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात विकासाचा नवा झंझावात निर्माण करण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी कंबर कसली आहे. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा हाती घेतला आहे. खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांची आमदार प्रा.राम शिंदे यांना जोरदार साथ मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी केलेल्या जोरदार पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 या योजनेतून 21.14 किलोमीटरचे काम होणार आहे. यातून मतदारसंघातील 4 महत्वाच्या रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्य अंतर्गत नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार कर्जत-जामखेड मतदारसंघातील चार रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जामखेड तालुक्यातील नान्नज ते घोडेगाव या 6.540 किलोमीटर रस्त्यासाठी 5 कोटी 69 लाख 20 हजार रूपये तर जवळा बोर्ले ते करमाळा रस्ता या 3.600 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी 28 लाख 35 हजार रूपये इतका निधी मंजुर झाला आहे.
तर कर्जत तालुक्यातील जलालपुर ते ताजू रस्ता या 5.600 किलोमीटर रस्त्यासाठी 5 कोटी 87 लाख 38 हजार तर नांदगाव ते राक्षसवाडी रस्ता या 5.400 किलोमीटर रस्त्यासाठी 5 कोटी 34 लाख 7 हजार इतका निधी मंजुर झाला आहे. आमदार प्रा.राम शिंदे आणि खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील 4 महत्वाचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुर झाल्याने मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याची कामे मंजुर होताच भाजपा कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कर्जत- जामखेड मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेच्या विशेषतः शेतकऱ्यांसाठी दळणवळणाच्या नाड्या असलेल्या या रस्त्यांची कामे व्हावीत अशी अनेक दिवसांपासून लोकांची मागणी होती. जनतेच्या याच मागणीचा विचार करून आमदार प्रा.राम शिंदे व खासदार डॉ.सुजय विखे पाटील या दोन्ही नेत्यांनी या प्रश्नी सरकार दरबारी पाठपुरावा करून या रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळवण्यात यश मिळवले. यामुळे नान्नज, जवळा, जलालपूर, ताजू , नांदगाव व राक्षसवाडीच्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कर्जत-जामखेड हा माझा मतदारसंघ आहे. येथील जनतेला उत्तम दर्जाचे रस्ते शासनाच्या माध्यमांतून तयार करून देणे हे माझे कर्तव्यच आहे. मी लोकांना दिलेला शब्द पाळणारा जबाबदार नेता आहे. मला दिशाभूल करता येत नाही. म्हणूनच जनतेने केलेल्या मागणीनुसार 20 कोटी रूपयांचे रस्ते मंजुर करून आणले.