संभाजीनगर हादरलं! गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा;९ वीच्या विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकावर चाकूने जीवघेणा हल्ला
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरामध्ये शहरवासीयांचा काळजाचा ठोका चुकवणारी आणि गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शाळेत नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने थेट वर्ग शिक्षकावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

या भीषण आणि अनपेक्षित हल्ल्यात संबंधित शिक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय घाटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. हा हल्ला करण्यासाठी विद्यार्थ्याने चक्क ऑनलाईन साईटवरून चाकू मागवला होता, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
टीसी मागण्यासाठी आला आणि वर्गशिक्षकावर केला जीवघेणा हल्ला
अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेची सविस्तर हकिगत अशी की, छावणी परिसरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिका या मंगळवारी (३० जून) दुपारी १२:०० वाजता नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिस केबिनमध्ये काम करत होत्या. याच वेळी शाळेचा ९ वीचा एक विद्यार्थी तिथे आला आणि त्याने शाळा सोडण्याच्या दाखल्याची (TC) मागणी केली. मुख्याध्यापिकेने त्याला रीतसर अर्ज करून फी भरण्यास सांगितले असता, त्याने अर्ज देण्यास नकार दिला. यावरून वाद वाढल्याने मुख्याध्यापिकेने परिस्थिती हाताळण्यासाठी त्याच्या वर्गशिक्षकास केबिनमध्ये बोलावून घेतले.
“तुला सोडणार नाही!”; मराठीच्या शिक्षकावर विज्ञानात नापास केल्याचा आक्षेप
वर्गशिक्षक केबिनमध्ये येताच संबंधित विद्यार्थी त्यांच्यावर प्रचंड भडकला आणि त्याने आरडाओरड सुरू केली. “सरांनी मला मुद्दामहून नववीच्या विज्ञान आणि गणित विषयात नापास केले, ज्यामुळे माझे एक वर्ष वाया गेले,” असा आरोप त्याने शिक्षकांवर केला. विशेष म्हणजे, जखमी झालेले वर्गशिक्षक हे शाळेत केवळ मराठी आणि हिंदी विषय शिकवतात, त्यांचा विज्ञान किंवा गणित परीक्षेच्या निकालाशी कोणताही संबंध नव्हता. मुख्याध्यापिकेने त्या विद्यार्थ्याला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र डोक्यात भूत शिरलेल्या या विद्यार्थ्याने “मी तुला जिवंत सोडणार नाही, तुझा गेम करतो,” अशी उघड धमकी देत कमरेला खोचलेला चाकू बाहेर काढला.
केबिनमध्ये कोंडून पोटावर केला चाकूचा वार; कर्मचाऱ्यांनाही दाखवला धाक
काही समजण्याच्या आतच विद्यार्थ्यांने वर्गशिक्षकाच्या पोटावर आणि बरगडीवर चाकूने वार केले. पोटावर गंभीर वार बसताच रक्ताच्या धारा वाहू लागल्याने मुख्याध्यापिकेने भीतीने ओरडत केबिनबाहेर धाव घेतली आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. कर्मचारी केबिनमध्ये शिरत असताना आक्रमक झालेल्या विद्यार्थ्याने त्यांच्यावरही चाकू उगारून त्यांना बाहेर जाण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने गंभीर जखमी वर्गशिक्षकांना केबिनमध्येच कोंडून ठेवले आणि बाहेर उभ्या असलेल्या सर्वांना चाकू दाखवून धमकी देत तो शाळेच्या आवारातून पळून गेला.
गुन्हा दाखल, आरोपी आठवी नापास
या खळबळजनक प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. मुख्याध्यापिकेच्या लेखी फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, आरोपी विद्यार्थी अल्पवयीन असून तो मुळचा आठवी नापास आहे, तसेच तो शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करत असल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळासह संपूर्ण संभाजीनगर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.