आयुष्यभर मुलींना घडवलं; शेवटी त्याच मुलींनी व्हिडिओ कॉलवरच उरकले वडिलांचे अंत्यसंस्कार… व्हायरल व्हिडिओने समाजमन सुन्न

सोनीपत : आयुष्यभर कष्ट करून तीन मुलींना शिकवलं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. मात्र वृद्धापकाळात त्याच मुलींनी वडिलांकडे पाठ फिरवल्याची हृदयद्रावक घटना हरियाणातील सोनीपत येथून समोर आली आहे. वृद्धाश्रमात राहत असलेल्या शिवचरण गुप्ता यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही मुली आल्या नाहीत. अखेर वृद्धाश्रमानेच त्यांच्या अंत्यसंस्कारापासून अस्थी विसर्जनापर्यंत सर्व विधी पार पाडले.

Shivcharan Gupta death case, Sonipat, Haryana – Viral video news

मिळालेल्या माहितीनुसार, शिवचरण गुप्ता हे मूळचे महाराष्ट्रात कापड व्यापार करत होते. व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर ते सोनीपत येथे स्थायिक झाले. सुमारे दीड वर्षांपूर्वी ते पत्नी मीना यांच्यासह सोनीपतमधील एका वृद्धाश्रमात राहण्यासाठी आले होते. दरम्यान, पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर शिवचरण गुप्ता वृद्धाश्रमात एकटेच राहत होते.

शिवचरण गुप्ता यांना मुलगा नव्हता. त्यांनी आपल्या तीनही मुलींना शिक्षण देऊन सक्षम बनवलं. त्यापैकी दोन मुली शिक्षिका झाल्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. सुमारे २० दिवसांपूर्वी वृद्धाश्रमाच्या संचालकांनी मुलींना वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. तरीही विविध कारणे देत त्यांनी येणं टाळल्याचा दावा वृद्धाश्रम प्रशासनाने केला आहे.

आजारपण वाढण्यापूर्वी शिवचरण गुप्ता मुलींशी फोनवर बोलत असत. मात्र प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांच्याशी संपर्कही कमी झाला. अखेरच्या क्षणी एकदा तरी मुलींना भेटावं, अशी त्यांची इच्छा होती. मात्र ती इच्छा अपूर्णच राहिली.

शिवचरण गुप्ता यांचे निधन झाल्यानंतर वृद्धाश्रमाने पुन्हा तिन्ही मुलींशी संपर्क साधला. जर त्या येणार असतील तर मृतदेह काही काळ सुरक्षित ठेवू, असेही सांगण्यात आले. मात्र वेळ नसल्याचे कारण देत त्यांनी येण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवण्याची विनंती करण्यात आली.

वृद्धाश्रमाच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये राहणाऱ्या मोठ्या मुलीने ऑनलाइन ₹५१०० पाठवून वडिलांवर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. सुरुवातीला मुलींनी अस्थी जतन करून ठेवण्याची विनंती केली. मात्र नंतर अस्थी घेण्यासाठीही कोणी येणार नसल्याचे सांगितले.

“आता बाबा नाहीत, येऊन काय करायचं? तुम्हीच अस्थी गंगेत विसर्जित करा,” असा संदेश त्यांनी दिल्याचे वृद्धाश्रम प्रशासनाने सांगितले. त्यानंतर अस्थी विसर्जनाची जबाबदारीही वृद्धाश्रमानेच पार पाडली.

माहितीनुसार, शिवचरण गुप्ता यांची मोठी मुलगी नेपाळमध्ये शिक्षिका आहे. दुसरी मुलगी निशा उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे राहते, तर धाकटी मुलगी प्रिया मुंबईत वास्तव्यास आहे. तिघींनीही अंत्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेमुळे वृद्धांची उपेक्षा, बदलती कौटुंबिक मूल्ये आणि वृद्धाश्रमांमध्ये वाढणारे वास्तव याबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. आयुष्यभर मुलांसाठी जगणाऱ्या पालकांच्या शेवटच्या क्षणी त्यांना आधार आणि आपुलकी मिळणं किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव करून देणारी ही घटना अनेकांना अंतर्मुख करणारी ठरत आहे.