शाळेपासून अफेअर अन् पुण्यात दुसरा प्रियकर! लव्ह ट्रँगलचा भयानक शेवट, पहिल्या प्रियकराने दुसऱ्याला संपवले
पुणे : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी (Hinjawadi) परिसरात प्रेमाच्या त्रिकोणातून (Love Triangle) घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. प्रेमसंबंधाच्या वादातून पहिल्या प्रियकराने दुसऱ्या प्रियकराची लोखंडी रॉडने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. या जीवघेण्या हल्ल्यात प्रेयसी तरुणीही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गुरुवारी (६ ऑगस्ट) ही धक्कादायक घटना घडली. (Pune Crime News Today)

घटनेनंतर पंढरपूरच्या दिशेने पळून जाणाऱ्या संशयित आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर सिनेमॅटिक पद्धतीने नाकाबंदी करून वाहनासह ताब्यात घेतले आहे. दिनेश महादेव झांबरे (वय २३, रा. पळशी, ता. पंढरपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सागर गायकवाड असे मृत तरुणाचे नाव असून, दिनेश महादेव झांबरे असे आरोपीचे नाव आहे. तर निकिता शिवाजी दनाने असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. हिंजवडीतील एका सात मजली पीजीमध्ये ही भयंकर घटना घडली.
पीजीच्या तिसऱ्या मजल्यावर रक्ताचा सडा
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी आरोपी दिनेश झांबरे हा पीजीमध्ये दाखल झाला. त्याने “सागर निकिताचा प्रियकर नसून निकिता माझी प्रेयसी आहे, मला सागरला भेटायचे आहे” असे सांगितले. सागर तिसऱ्या मजल्यावर असल्याचे समजताच दिनेश थेट वर गेला. काही क्षणांतच तिसऱ्या मजल्यावरून ओरडण्याचा आणि वाचवा-वाचवा असा मोठा आवाज येऊ लागला.
आवाज ऐकून पीजीतील कर्मचारी आणि इतर रहिवासी तिसऱ्या मजल्याकडे धावले. तेथे सागर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि आरोपी दिनेश त्याच्यावर लोखंडी रॉडने बेछूट वार करत होता. मध्ये पडलेल्या निकितालाही आरोपीने बेदम मारहाण करून लोखंडी रॉडने मारले. या हल्ल्यात सागरच्या डोक्यावर आणि शरीरावर तब्बल १३ ते १४ गंभीर वार झाल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर अत्यंत गंभीर अवस्थेत निकिताला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
शाळेतील प्रेम अन् पुण्यात बदलले समीकरण
पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी दिनेश आणि निकिता हे मूळचे एकाच भागातील असून त्यांच्यात शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढे दोघेही बीसीएचे (BCA) उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते. मात्र, पुण्यात आल्यानंतर निकिता आणि सागर यांच्यात जवळीक वाढली व त्यांच्यात नवे प्रेमसंबंध निर्माण झाले. आपल्या शालेय प्रेमात आलेला हा अडथळा आणि प्रेयसीने केलेला विश्वासघात सहन न झाल्याने दिनेशच्या मनात तीव्र राग निर्माण झाला होता.
याच रागाच्या भरात आरोपी दिनेश झांबरे याने गुरुवारी थेट हिंजवडीतील सात मजली पीजी हॉस्टेल गाठले. तिथे सागर गायकवाड आणि आपली प्रेयसी एकत्र असताना दिनेशने त्यांच्यावर लोखंडी रॉडने सपासप प्राणघातक वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागर गायकवाडचा जागीच प्राण गेला. तरुणीही या हल्ल्यात गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर आरोपी दिनेश आपल्या वाहनाने पंढरपूरच्या दिशेने पळ काढत होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर तातडीने नाकाबंदी लावली आणि संशयित आरोपीला गाठून त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.