फुलेवादी विचारांचा लढवय्या विचारवंत कालवश! जेष्ठ लेखक विचारवंत प्रा हरि नरके यांचे निधन । Prof. Hari Narke passed away

मुंबई: पुरोगामी चळवळीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. जेष्ठ लेखक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा हरि नरके यांचे निधन झाले आहे. प्रा हरि नरके यांच्यावर मुंबईतील बीकेसीतील Asian Heart Hospital येथे उपचार सुरु होते. 56 पुस्तकांचे लेखक अशी प्रा नरके यांची ओळख होती. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अतिशय परखड विचारांसाठी प्रसिध्द होते. ते शेवटच्या श्वासापर्यंत पुरोगामी विचारांच्या प्रसारासाठी लढत होते. (Senior writer and thinker Prof. Hari Narke passed away)

Pune news, Senior writer thinker Prof. Hari Narke passed away

सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. आज त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. १ जून १९६३ ला त्यांचा जन्म झाला होता.

मुंबईतील एशिअन हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मागील वर्षभरापासून हरी नरके आजारी होते. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात १५-२० दिवस दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एक-दोन महिन्यापूर्वी राजकोट येथील रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. आज ते मुंबईला येत असताना प्रवासात सहा वाजताच गाडीत त्यांना दोन उलट्या झाल्या. त्यानंतर समिर भुजबळ यांनी ड्रायव्हरला एशियन हार्ट घेऊन जाण्यास सांगितलं, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, हे त्यांचे पुस्तके प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहितात. सोशल मीडियावर ते सतत सक्रीय होते. अनेक सामाजिक विषयांवर ते थेट भाष्य करत असतं. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला होता. त्यांचे अनेक लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले आहेत.

महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा तरुणांपर्यत पोहचविण्याचे काम प्रा हरि नरके यांनी केले. त्यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यामुळे वैचारिकतेत मोठी भर पडत गेली. त्यांचे जाणे खूप क्लेशकारक आहे. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील पुरोगामी विचार चळवळीची मोठी हानी झाली आहे. नरके यांची वैचारिकता आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. भुजबळ म्हणाले, हरी नरके यांनी अनेक पुस्तकांचा अभ्यास करत तारीख-वार याबाबत वादविवाद करून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं काम लोकांना पटवून दिलं. त्यांच्यासारखा अभ्यास करणारा, इतिहासात जाऊन शोधणारा कोण भेटणार आहे? अशी भावना भूजबळ यांनी व्यक्त केली.

हरी रामचंद्र नरके हे एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर होते. सोशल मीडियावरही ते सातत्याने लिखाण करत. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांचा मोठा फॅन फॉलोविंग होता. विशेष म्हणजे २० तासांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एका मुलाखतीसंदर्भातील पोस्ट केली आहे. त्यामुळे, त्यांच्या अकाली निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.

मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याशिवाय महात्मा फुले यांचे मूळ छायाचित्र शोधून प्रसिद्ध करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. प्रमिती ही त्यांची मूलगी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.