जामखेड पंचायत समितीच्या वतीने ‘पदाधिकाऱ्यांना’ निरोप

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।  जामखेड पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांचा कार्यकाळ संपला. जामखेड पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांना नुकताच समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमातून अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यातील अजोड असा जिव्हाळा अधोरेखित झाला, पदाचा आणि अधिकाराचा बडेजाव न करता समन्वयातून तालुक्याचा विकास होऊ शकतो हेच पाच वर्षांत अधोरेखित झाले अश्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

जामखेड पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा निरोप समारंभ कार्यक्रम व श्री नागनाथ शिंदे व श्री कैलास खैरे यांचा सत्कार कार्यक्रमाचे जामखेडमध्ये आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल 20 मार्च रोजी संपुष्टात येत आहे तसेच पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल 13 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. या निमित्ताने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करत समारंभपूर्वक निरोप दिला.

यावेळी सभापती राजश्री ताई मोरे, उपसभापती मनीषा सुरवसे, सदस्य भगवानराव मुरूमकर, प्रा. सुभाष आव्हाड , जिल्हा परिषद सदस्या वंदनाताई लोखंडे, सोमनाथ पाचरणे, सूर्यकांत मोरे, रवी सुरवसे, कर्जतचे जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेलेकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की, मागील काही दिवसांत जामखेडमध्ये काम करत असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी प्रशासनाला सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे प्रशासनाला अधिक चांगल्या पद्धतीने काम करता आले. घरकुल विभाग आणि रोजगार हमी विभाग अशा विभागांमध्ये जामखेड तालुक्यामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण काम सुरू आहे.

यावेळी उपस्थित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी केले तर कृषी अधिकारी अशोक शेळके यांनी आभार मानले.