कर्जत तालुक्याला कुकडीचे तीन आवर्तन द्या – काकासाहेब धांडे यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली.या बैठकीत कालवा सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत उर्फ काका धांडे यांनी कर्जत तालुक्यासाठी कुकडीचे तीन आवर्तन सोडण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला पालकमंत्री अजित पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कुकडीचे रब्बी हंगामातील पहिले आवर्तन 15 डिसेंबरला सोडण्याचे निश्चित करण्यात आले. परंतू काही अपरिहार्य परिस्थिती निर्माण झाल्यास ते आवर्तन १ डिसेंबर पासून सोडण्यात येईल, असे बैठकीत ठरले.आवर्तन निश्चितीमुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कुकडी लाभक्षेत्रात कर्जत तालुक्याचा समावेश होतो. कर्जत तालुक्याला कुकडी कालव्याद्वारे पाणी दिले जाते. कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा.राम शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी कधीच कर्जत तालुक्याला पाणी कमी पडू दिले नव्हते. टेल टू हेड या सूत्राचा त्यांनी प्रभावी वापर केला होता. 2019 नंतर सत्तांतर झाल्यानंतर गेली तीन वर्षे कुकडीच्या आवर्तनात अनियमितता होती. यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले होते. परंतू राज्याचे माजी मंत्री प्रा राम शिंदे यांची विधानपरिषद सदस्य म्हणून वर्णी लागल्यानंतर त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कंबर कसली. कुकडीचे आवर्तन नियमितपणे सोडण्यात यावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. प्रा राम शिंदे हे आमदार झाल्यापासून कर्जत तालुक्याला कुकडीचे पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महायुती सरकारने आमदार प्रा राम शिंदे माध्यमांतून पहिल्यांदाच कुकडी कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदाची संधी कर्जत तालुक्याला दिली. आमदार प्रा.राम शिंदे यांचे कट्टर समर्थक चंद्रकांत उर्फ काका धांडे यांची सदस्यपदी वर्णी लागली. लाभक्षेत्रातील कर्जत तालुक्यात नेमकी स्थिती काय? किती आवर्तन लागतील? याचा स्थानिक नेतृत्वाला जितका अभ्यास असतो तितका अभ्यास बाहेरच्यांना नसतो. कुकडी कालवा सल्लागार समितीवर स्थानिक राजकीय नेतृत्व असल्याचा फायदा आजच्या बैठकीत झाला.

कुकडी आवर्तनाबाबत आज 20 रोजी पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत काकासाहेब धांडे यांनी कुकडी कालवा लाभ क्षेत्रासाठी तीन आवर्तन देण्याची मागणी केली. या मागणीला अजित दादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कुकडीचे पहिल आवर्तन येत्या १५ डिसेंबर रोजी सोडण्यात येईल परंतु जर काही अपरिहार्य परिस्थिती निर्माण झाल्यास ते आवर्तन १ डिसेंबरपासून सोडण्यात येईल असे बैठकीत ठरले. पुढील आवर्तनाच्या तारखा पुढील बैठकीत प्राप्त परिस्थितीनुसार ठरवण्यात येतील असे त्या ठिकाणी सांगण्यात आले. या बैठकीसाठी सर्व सदस्य हजर होते. काकासाहेब धांडे यांच्या समवेत डॉ सुनिल गावडे, कारभारी गावडे आदि हजर होते अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली.