Ashadhi Wari 2023 : अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्यामुळे वाचले वारकऱ्याचे प्राण । Siddharam Salimath IAS

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आषाढी वारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. 29 जूनच्या आधी सर्व पालख्या, दिंड्या आणि लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरात दाखल होतील. अनेक पालख्या सोलापुर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. सोलापुर जिल्हा वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. आषाढी वारीच्या या लगबगीत अहमदनगर व सोलापुर प्रशासनाने दाखवलेले प्रसंगावधान चर्चेत आले आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या समय सुचकतेमुळे एका वारकऱ्याचे प्राण वाचले आहे.

Ashadhi Wari 2023, Ahmednagar Collector Siddharam Salimath saved the life of Varakraya, Siddharam Salimath ias, Additional Collector of Solapur Tushar Thombre,

आषाढी वारीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. संपुर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण आहे. सोलापुर जिल्ह्यात शेकडो पालख्यांचे आगमन झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातून हजारो वारकरी यंदा वारीत सहभागी झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील वारकऱ्यांचा एक गट सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात दाखल झाला होता. यातील वारकरी सुभाष काशिनाथ पवार (राहणार भातोडे) यांना शेलगाव वांगी येथे शनिवारी 24 जून रोजी रात्री अडीचच्या सुमारास मायनर अटॅक आला होता. पवार यांच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी शामराव घोलप यांनी सदर घटनेची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना फोनद्वारे कळवली.

त्यानंतर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना सदर घटनेची कल्पना दिली. ठोंबरे यांनी तातडीने सुत्रे हलवत सुभाष पवार यांना वैद्यकीय मदत मिळवून दिली. याकामी त्यांना करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीयसहाय्यक संजय अंबोले यांनी मदत केली. अंबोले यांनी स्थानिक पातळीवर वेगाने सूत्र हलवत वारकऱ्याला वैद्यकीय मदत मिळवून दिली. यासाठी करमाळ्याचे कार्डियाक डाॅ जवळेकर यांची मदत घेतली. जवळेकर यांनी यांनी पवार यांच्यावर तातडीने उपचार केले. वेळेत उपचार मिळाल्याने पवार ठणठणीत बरे झाले. रविवारी ते पुन्हा वारीत सहभागी झाले.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी मध्यरात्री तत्परता दाखवून वारकऱ्याला तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देत वारकऱ्याचे प्राण वाचवले. प्रशासनात संवेदनशील व मानवतावादी अधिकारी अजूनही आहेत, याचाच परिचय या घटनेतून दोन्ही अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचिमुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे अहमदनगरच्या वारकऱ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.