Ankush Chattar Murder Case : अंकुश चत्तर हत्याप्रकरणात नगरसेवक स्वप्निल शिंदेंसह पाच जणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

अहमदनगर  : Ankush Chattar Murder Case : शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्या हत्येप्रकरणी नगरसेवक स्वप्निल शिंदेंसह पाच जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.मयत अंकुश चत्तर यांच्यावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला होता. रविवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Ankush Chattar news, Five people including corporator Swapnil Shinde arrested in Ankush Chattar murder case, ahmednagar local crime branch action,

जून्या वादातून अंकुश चत्तर यांच्यावर नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्या गटाने  प्राणघातक हल्ला केला होता. लोखंडी राॅडने चत्तर यांच्या डोक्यावर घाव घालत गंभीर जखमी करण्यात आले होते. 10 ते 15 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला होता. ही थरारक घटना अहमदनगरमधील एकवीरा चौकात शनिवारी रात्री घडली होती. जखमी अंकुश दत्तात्रय चत्तर ( वय 35, रा पद्मानगर, सावेडी ) यांच्यावर उपचार सुरू होते. परंतू  दुर्दैवाने या घटनेत चत्तर यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला.

अंकुश चत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मारेकऱ्यांचा शोधासाठी तोफखाना पोलिसांसह स्थानिक गुन्हेशाखेचे पथक आरोपींच्या मागावर होते. फरार भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदे, अक्षय प्रल्हाद हाके, महेश नारायण कुऱ्हे, मिक्या ऊर्फ सुरज राजन कांबळे, अभिजित रमेश बुलाखे (सर्व राहणार अहमदनगर) या पाच जणांच्या एलसीबीने विदर्भातून मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान, अंकुश चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे अहमदनगर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अंकुश चत्तर यांच्या अंत्यविधीदरम्यान पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क आहे.

नेमकं प्रकरण काय ?

शनिवारी रात्री 10: 15 वाजता अहमदनगर शहरातील एकवीरा चौकात दोन गटांत वाद उफाळून आला होता. यातील आदित्य गणेश औटी या तरूणाने सदर वाद सोडवण्यासाठी अंकुश चत्तर यांना फोन करून बोलावून घेतले होते. अंकुश चत्तर व चंदन ढवण यांनी सदरचा वाद सोडवला. त्यानंतर ते दोघे तेथून जात असताना राज फुलारी या तरूणाने त्यांना रोखले. त्याचवेळी दोन काळ्या रंगाच्या देवास नाव लिहिलेल्या गाड्या तेथे आल्या. या गाड्यांमधून नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱ्हे व इतर ७ ते ८ जण उतरले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे होते. महेश कुऱ्हे याच्या हातामध्ये बंदुक होती. ते सर्वजण अंकुश चत्तर यांच्याजवळ आले व तू स्वप्निल भाऊंचे नादी लागतोस काय? तुला स्वप्निलभाऊ काय आहे ते दाखवतो असे म्हणत सुरज उर्फ मिक्या कांबळे याने लोखंडी रॉडने मारण्यास सुरुवात केली.

त्याचवेळी इतरांनी चत्तर यांना मारण्यास सुरुवात केली. नगरसेवक स्वप्निल शिंदे हा याला संपवून टाका रे असे म्हणत चत्तर यांच्यादिशेने धावत आला. ते पाहून चत्तर हे सिटी प्राईट हॉटेलच्या दिशेने पळू लागले. त्यावेळी इतर आरोपी चत्तर यांच्या मागे पळत त्यांना मारत होते. चत्तर यांच्या डोक्यात मार लागल्याने ते रस्त्यावर पडले. त्यावेळी सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, महेश कुऱ्हे हे हातातील रॉडने चत्तर यांच्या डोक्यावर घाव घालत होते. तर याला संपवून टाका रे असे अभिजीत बुलाखे सांगत होता. तोही पळत येऊन चत्तर यांच्या डोक्यावर रॉडने घाव घालू लागला. त्याचवेळी स्वप्निल शिंदे तेथे आला व हा संपला का पहा रे, नसेल संपला तर त्यास संपवुन टाका व चला लवकर असे म्हणाला व सर्वजण गाडीत बसून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. मयत अंकुश चत्तर यांचे दाजी बाळासाहेब सोमवंशी यांनी तोफखाना पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यासह अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱ्हे, राजु फुलारी (सर्व रा. अहमदनगर) व इतर ७ ते ८ जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेतील मुख्य आरोपी नगरसेवक स्वप्नील शिंदे सह पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विदर्भातून अटक केली आहे.

दरम्यान, रविवारी रात्री राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नगरसेवक स्वप्निल शिंदे आणि त्यांच्या टोळक्याने एका कार्यकर्त्याची हत्या केल्याने अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे.