Vaishali Patil Jalgaon : लग्नाची हळद पुसण्याआधीच नियतीचा क्रुर खेळ, भीषण अपघातात नवविवाहितेचा मृत्यू

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जळगावमधून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका तरूणीची लग्नाची हळद पुसण्याआधीच नियतीने क्रुर खेळ खेळला आहे. एका भीषण अपघातात वैशाली पाटील या नवविवाहित तरूणीला मृत्यूने गाठल्याने जळगाव जिल्हा हादरून गेलाय.

Vaishali Patil Jalgaon,  cruel twist of fate before the wedding Haldi could even be washed off—newlywed woman dies in  horrific accident, Jalgaon latest news,

वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) असं मयत विवाहितेचे नाव असून या तरूणीचा ७ जुलै रोजी पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्यासोबत मोठ्या उत्साहात विवाह सोहळा पार पडला होता. विवाहानंतर नवदांपत्य देवदर्शन करून नुकतेच घरी परतले होते.

सोमवारी दुपारी वैशाली पाटील ह्या आपल्या काकांसोबत दुचाकीने माहेरी जात होत्या. विद्यापीठासमोर भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वैशाली यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे काका गंभीर झाले आहेत. लग्नानंतर अवघ्या सहाव्या दिवशी नियतीने क्रुर खेळ खेळत वैशाली यांच्यावर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विद्यापीठासमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २२ वर्षीय नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी चार वाजता घडली. मयत वैशाली यांचा ७ जुलै रोजी विवाह झाला होता. आज माहेरी जात असतानाचा त्यांच्यावर काळाने झडप घातली. तर प्रवीण पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच सासर आणि माहेरचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. अवघ्या सहा दिवसांपूर्वी नव्या आयुष्याची सुरुवात केलेल्या वैशाली यांच्या अकाली निधनाने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात अश्रू तरळले.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.