कोल्हापूर हादरले: सासूला ‘माँसाहेब’ अन् नवऱ्याला ‘सरकार’ म्हणण्याची सक्ती; सुनेचा भयंकर छळ, लेकीच्या आईचा करुण अंत
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अवघ्या महिन्याभरापूर्वी जन्मलेल्या चिमुरडीच्या बारशाची घरात जोरदार तयारी सुरू होती. बाळासाठी ऑनलाईन ५० हजारांचा पाळणाही मागवण्यात आला होता. मात्र, या आनंदाच्या वातावरणातच एक महिन्याच्या तान्ह्या मुलीने आपली आई गमावल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापुरातील राजारामपुरी येथे घडली आहे.

अस्मिता प्रतीकसिंह काटकर या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, ही आत्महत्या नसून सासरच्यांनी केलेल्या अमानुष छळामुळे झालेली हत्या असल्याचा गंभीर आरोप अस्मिताच्या माहेरच्यांनी केला आहे. या घटनेने संपूर्ण कोल्हापूर शहर सुन्न झाले आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये अस्मिता आणि प्रतीकसिंह काटकर यांचा विवाह झाला होता. नुकतीच अस्मिताची प्रसूती झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी १ महिन्याची झाल्याने घरात बारशाची लगबग सुरू होती. मात्र, बारशाचा आनंद साजरा होण्याआधीच अस्मिताने टोकाचे पाऊल उचलले. राजारामपुरी परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून, तान्ह्या नातीला पोरके करून लेक सोडून गेल्याने अस्मिताच्या आई-वडिलांनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला.
घरात अघोरी नियम, सासू ‘माँसाहेब’ तर नवरा ‘सरकार’
अस्मिताच्या पालकांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, सासरी अस्मितावर अनेक जाचक बंधने लादण्यात आली होती. साडीचा पदर डोक्यावरून कधीही ढळू द्यायचा नाही, घरातील मोठ्या व्यक्तींसमोर मान खाली घालूनच बोलायचे, बाहेरच्या माणसांसमोर बोलायचे नाही, आणि स्वतःचे मत मांडायचे नाही, अशा कडक नियमांत तिला ठेवले होते. एवढेच नव्हे तर सासूला आदराने “माँसाहेब”, सासऱ्यांना “आबासाहेब”, नवऱ्याला “सरकार” आणि नणंदेला “राणीसाहेब” म्हणण्याची सक्ती अस्मितावर करण्यात आली होती.
अस्मिता गरोदर असताना सासरच्यांना मुलगाच होईल याची खात्री होती. त्यांनी आधीपासूनच मुलाचे कपडे आणि खेळणी आणून ठेवली होती. मात्र, अस्मिताने मुलीला जन्म दिल्याने सासरच्यांचा अपेक्षाभंग झाला. मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्याऐवजी नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांनी अस्मिताला टोमणे मारण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक दबावाखाली होती. तसेच, लग्नात सासरच्यांच्या आग्रहाखातरही डान्स न केल्याच्या रागातून तिला लग्नापासूनच टार्गेट करण्यात आले होते.
१८ महिन्यांत २५ लाखांचा खर्च, तरीही हाव संपेना
अस्मिताच्या माहेरच्यांनी मुलीच्या सुखासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. मात्र सासरच्यांची पैशांची हाव काही संपली नाही.
लग्नात दिलेले स्त्रीधन: ९ तोळे सोने आणि ५ लाख रुपयांचा संसारसेट.
सणवार आणि मानपान: पहिल्या दिवाळीत जावयाचा मान राखण्यासाठी ८१ हजार रुपये, अधिक मासात रोख रक्कम आणि चांदीची भांडी.
डोहाळे जेवण: माहेरच्यांनी सुमारे २ लाख रुपये खर्च करून थाटामाटात डोहाळे जेवण केले.
प्रसूतीचा खर्च : अस्मिता आणि बाळाच्या आरोग्यासाठी वडिलांनी ७७ हजार रुपयांचा दवाखान्याचा खर्च स्वतः उचलला.
पाळणा: सासरच्यांच्या आग्रहामुळे बाळासाठी ५२ हजार रुपयांचा पाळणा खरेदी करण्यात आला.
लग्नापासून अवघ्या १८ महिन्यांत माहेरच्यांनी २५ लाख रुपयांहून अधिक खर्च केला. मात्र, तरीही सासरच्या मंडळींच्या मागण्या कमी झाल्या नाहीत, असा गंभीर आरोप अस्मिताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दिवसेंदिवस वाढणारा मानसिक ताण, अपमानास्पद वागणूक आणि पैशांसाठीचा दबाव यामुळे अस्मिता आतून खचली होती. मुलगी झाल्यावर हा दबाव आणखी वाढला आणि यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस अधिक तपास करत असून, अस्मिताच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी माहेरच्यांनी केली आहे.